लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : उन्‍हाळ्याच्‍या सुटीनंतर आता राज्‍यभरातील शाळा येत्‍या १५ जूनपासून सुरू होणार असून विदर्भातील शाळांची पहिली घंटा मात्र १ जुलैला वाजणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरु होत असताना सकाळी लवकर भरणाऱ्या शाळा आता ९ वाजता भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढू नये, तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध निर्णय घेण्यात येतात.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळा आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी दप्तराविना भरणार आहेत. त्यामुळे पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शनिवारी दप्तर नेण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचा विचार करीत यंदाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-नागपुरात काँग्रेसच्या वाढत्या मताधिक्याने भाजप चिंतेत! विधानसभेसाठी काय नियोजन…

विद्यार्थ्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी विभागामार्फत शाळांमध्ये विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. यात ऐतिहासीक तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेटी, स्काऊट गाईड, योगा, विविध खेळ यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे शनिवारी विद्यार्थ्यांची शाळा दप्तराविना भरणार आहे. आठवड्यातील पाच दिवस विद्यार्थ्यांना पुस्तकी धडे दिले जाणार आहेत तर शनिवारी विद्यार्थ्यांना शाळेत अन्य उपक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.

शाळा सुरू होण्‍यापुर्वी वर्ग खोल्‍यांची स्‍वच्‍छता, रंगकाम, किरकोळ डागडुजी ही कामे सध्‍या सुरू आहेत. हे सत्र सुरू होण्‍यापुर्वी शाळांना शिक्षण विभागाकडून विविध सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्‍यापुर्वीच पाठ्यपुस्‍तके, गणवेशाचे नियोजन केले आहे. विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू कराव्यात. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा ३० जून रोजी रविवार येत असल्याने १ जुलैपासून सुरू कराव्यात, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-‘नीट’ परीक्षेत मोठा गोंधळ, गुणांमध्ये प्रचंड वाढ! ‘चांगले गुण मिळवूनही दर्जेदार संस्थेत प्रवेश दुरापास्त

शाळा सकाळी ९ वाजेनंतर

पूर्व प्राथमिक ते इयत्‍ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरविण्‍याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने याआधीच राज्‍यातील सर्व माध्‍यमांच्‍या आणि सर्व व्‍यवस्‍थापनांच्‍या शाळांना दिल्‍या आहेत. यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्‍यात आला आहे. अनेकविध कारणांमुळे मुले रात्री उशिराने झोपतात. सकाळी लवकर शाळा असल्‍याने त्‍यांची झोप पूर्ण होत नाही. त्‍याचा नकारात्‍मक परिणाम विद्यार्थ्‍यांच्‍या शारीरिक आणि मानसिक आरोग्‍यावर होत असल्‍याने शिक्षण विभागाने शाळांच्‍या वेळा बदण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First day school on july 1 in vidarbha mma 73 mrj
Show comments