नागपूर : फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव. फुफ्फुसाद्वारे, नाकावाटे आत घेतलेला हवेतील प्राणवायू फुफ्फुस परत नाकावाटे बाहेर सोडते. जीवंत राहण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरते. त्याचप्रमाणे एखादे शहर पर्यावरणीयदृष्ट्या जीवंत ठेवण्यासाठी तेथील वृक्ष फुफ्फुसाचे काम करतात. नागपूरमधील कारागृह परिसरातील घनदाट वृक्ष हे सध्यातरी शहराचे फुफ्फुसच आहेत. मात्र त्यावर यापूर्वी मेट्रोसाठी घाव घालण्यात आला. शेकडो झाडे तोडण्यात आली आणि आता इंटरमॉडेल स्टेशनसाठी जागा घेऊन दुसरा घाव घालण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
शहराच्या मध्यभागी आलेल्या मध्यवर्ती कारागृहासह शेजारच्या परिसरातील सुमारे दीडशे एकर जागेवर इंटरमॉडेल स्टेशन उभारण्यात येणार आहे. बस पोर्टसह पंचतारांकित हॉटेलही राहील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित नुकतीच एक बैठक नागपुरात पार पडली. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडच्यावतीने इंटरमॉडेल स्टेशनची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. वैष्णवदेवी कटरा येथील इंटरमॉडेल स्टेशनच्या धर्तीवर उपराजधानीतील प्रकल्प साकारण्यात येईल. इंटरमॉडेल स्टेशन आणि बस पोर्ट उभारण्याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मध्यवर्ती कारागृहाची सुमारे शंभर एकर जमीन, अन्न महामंडळाची ४० ते ५० एकर, मेडिकल कॉलेजची ८ एकर आणि अजनी येथील सिंचन भवनाची सुमारे ५ एकर जमीन या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा – धक्कादायक! चिचडोह बॅरेजमध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू
कारागृह, मेडिकल आणि सिंचन भवनसाठी जिल्हाधिकारी समन्वय साधणार आहेत. अन्न महामंडळाच्या जागेबाबत महामार्ग प्राधिकरण वाटाघाटी करणार आहे. जागेबाबत समन्वय प्रकल्पाचे डिझाइन आणि किंमत निश्चित करण्यासाठी सुमारे दोन महिने लागण्याचा अंदाज आहे. इंटरमॉडेल स्टेशन परिसरात वाहतूक आणि व्यावसायिक झोन राहील. प्रवासी संकुलासह पंचतारांकित हॉटेल व अन्य सोयी, सुविधा राहतील. रेल्वेस्थानकाखालून जाण्यायेण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
हेही वाचा – कोकणात उष्णतेच्या लाटांचा इशारा, राज्यात तीन आठवडय़ांपासून सरासरीपेक्षा अधिक तापमान
मोजक्याच मोकळ्या जागा शिल्लक
नागपुरात मोजक्याच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यात प्रामुख्याने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कारागृहाच्या शहरातील मध्य वस्तीतील जागेचा समावेश आहे. मात्र विकासाच्या नावावर त्या बळकावण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहे. कारागृहाच्या विस्तीर्ण जागेत मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. कैदी तेथे शेती करतात. तेथे मोठे पाण्याचे तळे आहे. यापूर्वी येथील काही जागा मेट्रो प्रकल्पासाठी घेण्यात आली. आता इंटर मॉडेल स्टेशनसाठी संपूर्ण कारागृहाचा परिसरच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्याला नागपूरकरांचा विरोध होण्याची शक्यता आहे.