नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभाग, बजाज इलेक्ट्रिकल्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील पहिले अद्ययावत शासकीय तंबाखू मुक्ती केंद्र कामठी उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाले आहे. येथे तंबाखूचे व्यसन असलेल्यांवर उपचार, समुपदेशनाची सुविधा आहे.
कामठीतील उपकेंद्रातील केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. धुमाळे, योग शिक्षक योगश तुलशान, डॉ. विनोद पाकधुने, डॉ. डांगोरे, डॉ. अमितकुमार धमगाये, डॉ. स्वाती फुलसंगे, जिल्हा मौखिक अधिकारी डॉ. दानिश इकबाल आणि उपजिल्हा रुग्णालयातील बरेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. दानिश इकबाल यांनी उपस्थितांचे उद्बोधन केले.
हेही वाचा – नागपूर : खेळताना ‘बॅटरी’चा स्फोट, ९ वर्षीय मुलगा अत्यवस्थ
नागपूरसह राज्यात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत आहे. त्यात खर्रा, गुटखा, पानमसाला सेवन आणि बीडी-सिगारेटसह इतरही तंबाखूजन्य पदार्थांच्या धूम्रपानाचा समावेश आहे. ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्वेक्षणात १५ ते १८ वयोगटातील मुलांपैकी २८ टक्के जणांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वा धूम्रपानाचे व्यसन असल्याचे पुढे आले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासन व बजाज फाऊंडेशन एकत्र काम करत आहे. उपक्रमाअंतर्गत नागपुरातील कामठी उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत केंद्राचा शुभारंभ झाला. त्यात बजाज फाऊंडेशनने सामाजिक दायित्व निधीतून खुर्च्या, टेबल, ‘कार्बन मोनाक्साईड मीटर’सह इतरही साहित्य उपलब्ध केले आहे. सोबत प्रशिक्षणाची सोयही केली आहे. केंद्रात एक दंतरोग तज्ज्ञ आणि एक समुपदेशकही उपलब्ध राहील.