नागपूर : उपराजधानीत बुधवारी करोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे येथील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता ५ रुग्णांवर पोहचली आहे. शहरात पुन्हा रुग्ण आढळू लागल्याने नवीन वर्षावर करोनाचे सावट उभे ठाकल्याचे चित्र आहे.शहरात आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये धरमपेठ परिसरातील ६० वर्षीय पुरुष, नंदनवन परिसरातील ३५ वर्षीय महिला आणि आणखी एका महिलेचा समावेश आहे. यापूर्वीही गेल्या दोन ते तीन दिवसांआधी शहरात एक ८१ वर्षीय पुरुष आणि ६० वर्षीय पुरुषालाही करोना असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता पाच रुग्णांवर पोहचली आहे.

शहरातील एकूण करोनाग्रस्तांमध्ये तीन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाही करोनाचे संक्रमण ज्येष्ठांमध्ये जास्त असल्याचे प्राथमिक निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदवले आहे. या सगळ्याच रुग्णांचे नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनुकीय तपासणीसाठी निरीच्या प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्याच्या अहवालातून हा करोनाचा कोणता उपप्रकार आहे, हे कळू शकेल. यापूर्वीही महापालिकेने एकूण ९ रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे, हे विशेष.विदर्भातील करोनाच्या जेएन १ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण अकोला महापालिका हद्दीत आढळून आला आहे. सदर रुग्णाच्या जनुकीय तपासणीतून ही बाब स्पष्ट झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.

Story img Loader