Agniveer Recruitment: लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्निवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले असून ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेतील निकष या भरतीला लागू होणार आहेत. त्यामुळे भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाईन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
हेही वाचा >>>12th Exam : विद्यार्थ्यांकडे ‘कॉपी’ सापडल्यास पर्यवेक्षकाची उचलबांगडी!
लष्कराने ‘अग्निवीर’ भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले असून ऑनलाईन नोंदणी १५ मार्च २०२३ पर्यंत करता येणार आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी भरती प्रक्रिया ५ ते ११ जुलैला नागपुरात होणार आहे. आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाईन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल. बदललेल्या पद्धतीनुसार आकलनसंबंधित पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या बदलामुळे भरती मेळाव्यादरम्यान होणारी गर्दी कमी होईल. त्यामुळे भरती प्रक्रियेचे आयोजन-व्यवस्थापन करणे सोपे होईल, अशी चर्चा आहे.