वर्धा : वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वास गेला असल्याने डिसेंबरच्या अखेरीस रेल्वे धावायला सुरुवात होणार आहे. खासदार रामदास तडस यांनी नागपूर विभागीय रेल्वेचे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, उपमुख्य अभियंता प्रशांत नेलिकवार व अन्य अधिकाऱ्यांसोबत या मार्गाची पाहणी केली.
या मार्गाचा वर्धा ते यवतमाळ हा ७८ किलोमिटरचा पहिला टप्पा व यवतमाळ ते नांदेड हा २०६ किलोमीटरचा दुसरा टप्पा असून एकूण २८४ किलोमीटरचा रेल्वेमार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चातून पूर्णत्वास जात आहे.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या अडचणी वाढणार? दोन गुन्हे लपवल्याबाबत साक्षीदाराचा मोठा खुलासा
वर्धा जिल्ह्यातील वर्धा ते यवतमाळ या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या एकल मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाणपुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. वर्धा ते कळंब या चाळीस किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. देवळी रेल्वे स्थानकाच्या सुसज्ज वास्तूचे काम पूर्ण झाले असून फलाट व इतर कामे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा देवळी ते कळंब मार्गावर रेल्वेगाडी धावण्याची श्क्यता व्यक्त होते. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याचे खासदार तडस म्हणाले.
देवळी रेल्वे स्थानकाच्या भव्य प्रवेशद्वारावर परिसरातील स्वातंत्र्यसेनानींच्या आठवणी साकरण्याचा प्रयत्न रेल्वे खात्यातर्फे होणार आहे. २००९ मध्ये मंजूर झालेला वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात २०१६ साली झाली. केंद्र व राज्य शासनाने आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करून दिला.
या प्रकल्पाच्या कामावर पंतप्रधान कार्यालयातील प्रगती पोर्टलच्या माध्यमातून देखरेख ठेवल्या जात आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये वर्धा ते कळंब दरम्यान रेल्वे प्रवास चाचणी घेण्याची संभावना आहे. तसे नियोजन करण्याची सूचना तडस यांनी दिली. वर्धा व यवतमाळ जिल्हा रेल्वेने जोडल्या जाणार असल्याने औद्योगिक महत्व लक्षात घेवून मालधक्का वेळेत पूर्ण करावा. त्यासाठी आवश्यक तरतूदींचा नियोजनात समावेश करण्याची सूचना करण्यात आली. वर्धेतून नांदेडला जाण्यासाठी उपलब्ध रेल्वे सेवेने सध्या साडेदहा तास लागतात. हा मार्ग पूर्ण झाल्यावर केवळ चार तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा हा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार असून, कमी पैशात नागरिकांना हा दूरवरचा प्रवास शक्य होईल. लवकरच हा मार्ग लोकसेवेत दाखल होण्याचा विश्वास तडस यांनी व्यक्त केला.