वर्धा : सीताराम, सियाराम म्हणून राम आणि सीतेचा संयुक्त उल्लेख होतो. रामाच्या मंदिरात सीता आणि हनुमान असतातच. पण उल्लेख राम मंदिर किंवा हनुमान मंदिर असाच होतो. स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून सीतेची ओळख किंवा मंदिर नसतेच. पण त्याला अपवाद आहे. सीतेने विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत लव कुश यांना स्वतंत्र व्यक्तिमत्व दिले. सीतेचे हे कार्य एक माता म्हणून थोर पण दुर्लक्षितच. असा भाव शेतकऱ्यांचे पंचप्राण म्हणून ओळखल्या जाणारे शरद जोशी यांनी मांडला होता.

स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व व लढा देण्याची ताकद पाहून शरद जोशी यांनी त्यांच्या मोठमोठ्या आंदोलनात महिलांचा सहभाग नोंदविला होता. स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून मग त्यांनी सीता मंदिरास उजेडात आणले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात रावेरी येथे प्राचीन सीता मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार जोशी यांनी केला. पुढे खासदार निधीतून त्यांनी या मंदिराचा कायापालट केला. पण हे केवळ पूजेचे मंदिर राहू न देता स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून पुढे आणले. येथे शेतकरी संघटनेचे विविध कार्यक्रम होत असतात.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ५ मे रोजी दुपारी या मंदिरात सीता नवमी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. स्वयंसिद्धा सीता नवमी सोहळा म्हणून साजरा होणारा हा उपक्रम माजी आमदार वामनराव चटप व सरोजताई काशीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या सोहळ्यात ज्या महिलांनी पती निधन किंवा घटस्फोट झाल्याने एकाकी पडल्यावर विपरीत स्थितीत लव कुश यांच्याप्रमाणे मुलांना घडविले, अशा धैर्यशील मातांचा सीता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षी रोहिणी शशांक सावजी नागपूर, अंजनाबाई काळे, रा. बीबी चंद्रपूर, पूर्वा सुधीर देशपांडे राजुरा, उज्वला दिलीप मोंढे नागपूर, वंदना मनोज कुबडे वर्धा, संगीता सुनील मोहितकर वरोरा, प्रणाली शत्रुघ्न बावणे नागपूर या सात महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान प्रदान केल्या जाणार आहे.

या विशेष सोहळ्यास संघटना नेते ललित बहाळे, प्रज्ञा बापट, अनिल घनवट, दिनेश शर्मा, सीमा नरोडे, शैला देशपांडे, मधुसूदन हरणे, सतीश दाणी व अन्य हजर राहतील. आयोजन शेतकरी संघटनेच्या विविध आघाड्या, ग्रामपंचायत, हनुमान मंदीर देवस्थान तसेच राजेंद्र झोटिंग, गणेश मुटे, उल्हास कोटंबकार, अरविंद राऊत, सारंग दरणे, सरपंच राजेंद्र तेलंगे, वर्षा तेलंगे, प्रमोद तलमले, मुकेश धाडवे, खुशाल हिवरकर नारायणराव काकडे व गावकऱ्यांनी केले आहे.