नागपूर : जिल्ह्यात डिसेंबर-२०२२ मध्ये करोना व स्वाईन फ्लू हे दोन्ही आजार नियंत्रणात होते. त्यानंतर नुकताच जिल्हा करोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता पुढे आली. परंतु नववर्षात १ जानेवारीपासून आजपर्यंत शहरात स्वाईन फ्लूच्या ६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. या मृत्यूवर महापालिकेच्या मृत्यू अंकेक्षण समितीने शिक्कामोर्तब केले आहे.
हेही वाचा >>> संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन
डिसेंबर २०२२ मध्ये हा आजार नियंत्रणात आला होता. परंतु नववर्षांत पुन्हा ६ रुग्ण आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी महापालिकेत मृत्यू विश्लेषण समितीची बैठक झाली. त्यात महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मेयोचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रवीण सलामे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागचे डॉ. रवींद्र खडसे, बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद सूर्यवंशी, डागा रुग्णालयाच्या स्त्रिरोगतज्ञ डॉ. माधुरी थोरात, महापालिकेतील स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत ७२ वर्षीय रुग्ण स्वाईन फ्लूने दगावल्यावर शिक्कामोर्तब झाले. परंतु या रुग्णाला इतर सहआजार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. एकूण रुग्णांपैकी पाच रुग्ण आजारमुक्त झाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.