नागपूर: राज्यात उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्याकडे नागरिकांनी विविध कारणाने पाठ फिरवली आहे. या पाट्या बसवण्याच्या कामाला वेग यावा म्हणून राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने नवीन युक्तीवर काम सुरू केले आहे. त्यानुसार आता राज्यातील सगळ्याच जिल्ह्यात व शहरात या पाट्या लावण्यासाठीचे फिटमेंट सेंटर वाढवले जाणार आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयाकडून तसा आदेश शनिवारी (२२ मार्च २०२५) राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना मिळाला आहे.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याचे काम ३ एजन्सीकडे आहे. १ जानेवारी २०२५ पासून हे काम सुरू झाले. सध्या  खूपच संथ आहे. त्याला फिटमेंट सेंटरची संख्या कमी असणे, ऑनलाईन अपाॅईंटमेंट घेण्याच्या प्रक्रियेत अडचणी प्रमुख कारण आहेत.

आता झटपट एचएसआरपी बसवण्यासाठी प्रत्येक आरटीओकडून सगळ्याच जिल्ह्यात संबंधित एजेंसीमार्फत केंद्र वाढवण्याची सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाने केली आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयांनी मोटर वाहन निरीक्षकांमार्फत फिटमेंट सेंटरची तपासणी करून त्याला लवकर मंजुरी देण्याचेही परिवहन खात्याचे आदेश आहे.

दरम्यान १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सगळ्याच वाहनांना वितरकाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक होते. परंतु काही वितरकांनी ही पाटी न बसवताही वाहने वितरीत केल्याच्या काही तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे असे वितरक आढळल्यास त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईच्याही सूचना आदेशात आहेत.

२५ हून जास्त वाहने असल्यास सोयीच्या ठिकाणी….

सर्व आरटीओ कार्यालयांना त्यांच्या हद्दीतील बस, ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक संघटनांची बैठक घेऊन या पाटीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. एका ठिकाणी २५ हून अधिक वाहनांना टी बसवण्यासाठी अर्ज केल्यास कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न आकारता पाटी बसवण्याचे आदेश सर्व आरटीओ कार्यालयांना आहेत.

पाटी बसवण्याला मुदतवाढ

वाहनाची उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी परिवहन विभागाने मुदतवाढ दिली आहे. आता ३० जून २०२५ ही अंतिम तारीख असणार आहे. दरम्यान सुरवातीला वाहनधारकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, अंतिम मुदतीत एक महिन्याची वाढ केल्यावर ३० एप्रिल २०२५ पर्यंत पाटी बसवण्यास परवानगी दिली गेली होती. आता शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील वाहनधारकांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटील लावता येईल.

Story img Loader