यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी उजेडात आल्या आहेत. २०२३ मध्ये पश्चिम विदर्भात आतापर्यंत एक हजार २७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य सरकारच्या शेतकरी स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.जिल्ह्यातील लोणंदरी येथील फकीरजी बोलके, कोलगाव येथील प्रदीप अवताडे, डोंगरगाव येथील बाबाराव डोहे, सिंधी वाढोणा येथील मारोती अवताडे तर उमर विहीर येथील अमित्रा पवार यांनी आत्महत्या केल्याची बाब उजेडात आली आहे. तर शेतकऱ्यांसोबत शेतमजूरही आत्महत्या करीत असल्याचे एका घटनेने पुढे आले. बोथ येथील कुणाल शेडमाके या आदिवासी शेतमजुराने आत्महत्या केली आहे.
२०२३ या वर्षात २४ डिसेंबरपर्यंत अमरावती विभागात या दशकातील सर्वाधिक एक हजार २७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. २००१ पासून विदर्भातील २६ हजार ५६८ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केल्या आहेत. विदर्भात सरासरी दररोज पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करत असल्याने हा सामाजिक चिंतेचा विषय झाला आहे.कृषी धोरणात्मक स्वरूपात विदर्भातील ४० टक्के आत्महत्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये सरकारने एकात्मिक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. विदर्भात मागील वर्षीच्या तुलनेत कापूस, सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली. शेतमालास भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नापिकीमुळे आर्थिक संकट आले आहे. लागवडीचा खर्च वाढला, मात्र बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केले. नुकसान होवूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून तो आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम राबवावा, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.