अवैध व्‍यवसाय करणाऱ्या पाच गुंडांनी एका युवकाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना पथ्रोट पोलीस ठाणे हद्दीतील शिंदी बु. येथे सरत्या वर्षाच्या रात्री घडली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविला असून मारेकरी अद्याप गवसलेले नाहीत. अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना पुरविल्याच्या संशयातून या युवकाची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> बसस्‍थानकावरच महिलांमध्‍ये हाणामारी…केस धरून ओढत….

सनी दशरभ भीमसागर (२५) असे मृत युवकाचे नाव आहे. फिर्यादी दशरथ भैय्यालाल भीमसागर पोही रोड शिंदी बु. येथे ३ मुलांसह राहतात. काही दिवसांपूर्वी पथ्रोट पोलिसांनी मुख्य आरोपी अभिजीत बबन मात्रे याच्या अवैध व्यवसायावर छापा टाकला होता. याची माहिती दशरथ यांचा मुलगा सनी याने दिल्याच्या संशयावरुन अभिजीत बबन मात्रे याच्यासह शेख शफीक शेख रफीक सौदागर, शेख आतीक शेख रफीक सौदागर, शुभम ऊर्फ गोलु मन्नालाल धुर्वे, शंकर मन्नालाल धुर्वे यांनी सनी याच्यावर हल्ला केला.

हेही वाचा >>> धक्कादायक! नापास का होतोस? असे विचारले म्हणून  मुलाने आई-वडिलांनाच संपवले..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा कुत्र्याला घेऊन बाहेर उभा असताना आरोपी अभिजीत मात्रे याने त्याच्या छातीवर तलवारीने वार केला. शंकर मन्नालाल धुर्वे, शफीक शे. रफीक सौदागर याने सनीला जखमी अवस्थेत रस्त्यावर घासत नेले. सनी याला त्याचा लहान भाऊ भीमराज याने मित्राच्या मदतीने पथ्रोट आरोग्य वर्धिनी केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी हल्ल्यानंतर मोटरसायकलींवरून पळून गेले. सर्व आरोपी पसार असून ३ पोलीस पथके आरोपींचा माग घेत आहेत. काही दिवसापूर्वी मुख्य आरोपी अभिजीत बबन मात्रे याच्याकडे पथ्रोट पोलिसांनी छापा टाकून दारु जप्त केली होती.

या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले होते.   त्या अवैध व्यवसायाची माहिती सनी याने पोलिसांना दिली असल्याच्या संशयावरुन हत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे. अवैध व्यवसायाला रोखण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे. हा अवैध व्यवसाय शाळा परिसरातच सुरू होता. त्याची तक्रार पालकांनी पथ्रोट पोलिसांत तक्रार केली होती. स्थानिक पोलीस ठाणे अशा घटनांना अटकाव घालतील की अजून काही बळी जातील असा सवाल नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे शिंदी या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Story img Loader