भंडारा, नागपूर : विदर्भात सोमवारी वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यांत रोवणीदरम्यान वीज कोसळल्याने दोन महिला मजुरांचा तर, चिचटोला येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यांतील मोहपा येथे वीज कोसळून पती-पत्नी दगावले. रविवारपासून विदर्भात पावसाने जोर धरला आहे. नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना ग्रामीणमध्ये मात्र मुसळधार पाऊस आहे. रविवारपासून सुरू झालेला पाऊस सातत्याने सुरूच आहे. भंडारा जिल्ह्यात रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारात सोमवारी दुपारी घडली. जखमी महिलांवर मोहाडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> ‘वाशीम म्हणजे कचरापेटी वाटली का?’….पूजा खेडकर यांच्या बदलीवरून शहरात संताप….
मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. अशातच रविवारी पाऊस आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धानाच्या रोवणीला सुरुवात केली आहे. आंधळगावपासून चार किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव शेतशिवारातील नाना सेलोकर यांच्या शेतावर काही महिला मजूर रोवणीच्या कामात व्यस्त होत्या. दरम्यान, दुपारी ढगांचा गडगडाट होऊन वीज कोसळली. यात आशा सुरेश सोनटक्के आणि कला तुकाजी गोखले या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. त्या आंधळगाव येथील रहिवासी होत्या, तर रुखमा बंडू निमजे, मैना पतीराम सेलोकर (रा. आंधळगाव) आणि वंदना मधुकर जिभकाटे, निशा जिभकाटे (रा. डोंगरगाव) या चार महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरी घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात घडली. येथे वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी लाखनी तालुक्यातील चिचटोला येथे सायंकाळी वीज कोसळल्याने यादवराव बाळाजी दिघोरे (५२) यांचा मृत्यू झाला. तिसरी घटना नागपूर जिल्ह्यातील मोहपा येथे घडली. मोहपा येथे वीज कोसळून शेतकरी पती-पत्नीचा मृत्यू झाला. प्रभाकर केशवराव रेवतकर (६५) आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर, अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
हेही वाचा >>> हवामान खात्याचा ‘हायअलर्ट’, १८ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार
दरम्यान, विदर्भातील नागपूरसह अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारीही पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सोमवारी पुनरागमन केले. जोरदार मेघगर्जनेसह सोमवारी सायंकाळी पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे सर्वत्र परिसर जलमय झाला आहे. मागील संपूर्ण आठवडा कोरडा गेल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. सोमवारी सकाळी ढगाळ, तर दिवसभर उन्हाचा पारा चढला होता. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ढग दाटून आले. मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासापर्यंत पाऊस पडला. या पावसामुळे सिंचन प्रकल्पातीन पाण्याच्या पातळीत वाढ नोंदवल्या गेली आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी ढगफुटीसदृश पासऊ कोसळला. दोन तासात ११९ मि.मी मुसळधार पाऊस झाल्याने महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची पोलखोल झाली. रस्त्यांना नाल्यांचे स्वरूप आले, तर अनेकांच्या पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.