लोकसत्ता टीम
नागपूर : राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा असणारे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल पाच मोरांचा मृत्यू झाला. देशभरात एकीकडे ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव असताना एकाचवेळी झालेल्या या मृत्युने खळबळ उडाली आहे. या मृत्युमागे शेतावर फवारली गेलेली किटकनाशके कारणीभूत असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. मात्र, तब्बल चार दिवसाने या पक्ष्याच्या मृत्युचे अवशेष नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील संस्थेला पाठवण्यात आले. त्यामुळे वनखात्याला याचे गांभीर्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपराजधानीपासून दूर काही अंतरावर असलेल्या कामठीजवळील खैरी येथे एका शेतात एकाचवेळी पाच मोर आणि काही पक्ष्यांच्या मृत्यूची घटना उघडकीस आली. वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोरांच्या या मृत्यूने खळबळ उडाली.
आणखी वाचा-“मावा नाटे मावा राज” चळवळीचा आधारस्तंभ हरपला, मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन
‘एव्हीयन इन्फ्ल्युएंझा’(एच१एन१) या विषाणमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भात शासनाकडून ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. अशातच पाच मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यु समोर आल्याने भीतीचे वातावरण आहे. काही सर्पमित्रांना शेतात मोर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी आले. ही घटना शनिवारी घडली, पण राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा असणारा आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनुसूची एकमध्ये असणारा हा पक्षी मृत असूनही खात्यातील संबंधीत अधिकाऱ्यांमध्ये त्याविषयी गांभीर्य दिसून आले नाही. खात्याची चमू घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याठिकाणीच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन व अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या किटकनाशकांमुळे झाला असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही अवयवाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील संस्थेला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
आणखी वाचा-असेही औदार्य! मित्रांनी भेट दिली कार, ती विकून घेतली रुग्णवाहिका…
यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका आदमने यांना विचारले असता त्यांनी हे नमुने वनखात्याच्या अखत्यारितील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मंगळवारी पाठवल्याचे सांगितले. तर उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांनी हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. या दोन्ही कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत परस्परविरोधी वक्तव्ये केली. तसेच शनिवारी मृत्यू होऊन देखील नमुने अजूनपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आली नाहीत. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अनुसूची एकमध्ये असणाऱ्या आणि राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा असणाऱ्या या पक्ष्याविषयी खाते खरंच गंभीर आहे का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.