गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी पोलिसांसह रविवार, २६ फेब्रुवारीला संयुक्त कारवाई करीत मंगेझरी आणि पालांदूर येथे छापा टाकून विविध वन्यप्राण्यांचे अवयव जप्त केले. आरोपींकडून देशी दारूच्या २२ पेट्या आणि रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- वर्धा : पंतप्रधानांच्या गतीशक्ती योजनेमुळे रुपडे पालटणार; ‘ही’ रेल्वे स्थानके होणार चकाचक

याप्रकरणी शामलाल विक मडावी (रा. मांगेझरी देवरी), दिवास कोल्हारे (रा. मांगेझरी), माणिक दरसू ताराम (रा. मांगेझरी), अशोक गोटे (रा. मांगेझरी) व रवींद्र लक्ष्मण बोडगेवार (रा. पो. पालांदूर, ता. देवरी, जी. गोंदिया) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी माणिक दरसू ताराम हा आत्मसमर्पित नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्यांचे २ दात, १ नख, अस्वलाची ३ नखे, १० रानडुक्कर सुळे, चितळाचे १ शिंग, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले, ताराचे फासे, १ जिवंत मोर, ५ बंडल मोरपिसे, रानगव्याचे १ शिंग, जाळे, सुकलेली हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, २२ पेटी देशी दारु (अंदाजे किंमत ८४,००० रु.) आणि रोख २१,४९,४४० रुपये हस्तगत करण्यात आले. पाचही आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या विहित कलमान्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला.

हेही वाचा- ‘आनंदाचा शिधा’ : दिवाळीचा अनुभव गुडीपाडव्याला नको, काय म्हणतात शिधापत्रिका धारक

सखोल तपासात आरोपींनी दुर्मिळ काळा बिबटची शिकार केल्याचेही समोर आले व त्याबाबतचे पुरावे हस्तगत करण्यात आले. दरम्यान, आरोपींकडून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम दारू विक्रीतील नसून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या व्यवहारातून मिळाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने आमचा तपास सुरू आहे. यात आणखी काही आरोपी अडकण्याची शक्यता असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five persons arrested in gondia district in connection with smuggling of wild animal organs sar75 dpj