नागपूर: नागपूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांमध्ये ५८० अपात्र (बोगस) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील एका शाळेत अपात्र मुख्याध्यापकाच्या नेमणुकीच्या प्रकरणात आधीच नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि बनावट नियुक्ती मिळालेले मुख्याध्यापक पराग पुंडके यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी बनावट मुख्याध्यापक प्रकरणाचा तपास करताना त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवत ते अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपर्यंत नेले आहे. त्या अनुषंगाने रात्री नागपूर पोलिसांनी अधीक्षक वर्ग दोन, माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील निलेश मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपीक सुरज नाईक या तिघांना अटक केली आहे. परंतु, अनेक वर्षांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांचे पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करणे, त्यांना बढती मिळवून देणे, बनावट शालार्थ आयडी तयार करण्यासाठी कागदपत्रांची मदत करण्यात निलेश मेश्राम अग्रेसर असल्याची माहिती आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधारच निलेश मेश्राम असल्याची चर्चा असून त्याची जवळपास ५० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचाही आरोप होत आहे.

उल्हास नरड आणि निलेश वाघमारे भिन्न प्रकरणे

विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना रविवारी सदर पोलिसांनी गडचिरोली येथून अटक केली. त्यांच्याविरोधात मुन्ना तुलाराम वाघमारे (वय ३८, रा. पालांदूर, भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. २०१० मध्ये मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनविण्यात आले हा आरोप नरड यांच्यावर आहे. तर जिल्ह्यात २०१९ पासून सुमारे ५८० प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे तसेच, शालार्थ आयडी प्रदान करण्याच्या आदेशांची कोणतीही शहानिशा न करता, बनावट शालार्थ आयडी प्रदान करून नियमबाह्य पद्धतीने वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे दोषी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासनाने वाघमारे यांना पुढील कारवाई होईपर्यंत निलंबित केले आहे.

अशी आहे निलेश मेश्रामची संपत्ती

निलेश मेश्राम हे २००४ पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत होते. यादरम्यान त्यांनी अनेक बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप होत आहे. तसेच प्रत्येक कामांसाठी पैसे घेतले जात होते. अटकेत असलेले मुख्याध्यापक पुडके यांचे बनावट कागदपत्रे तयार करून देण्यासाठी मेश्राम यांनी दहा लाख रुपये घेतल्याची माहिती आहे. सध्या निलेश मेश्राम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत आहे. त्यांच्या नागपूर येथे पाच शाळा असल्याची माहिती आहे. सेंड विल्सेंट कॉन्व्हेंट मनीष नगर नागपूर,  सेंड विल्सन कॉन्व्हेंट खामला नागपूर, मनीष हायस्कूल खामगाव तालुका सावनेर अशा तीन शाळांची नावे सध्या समोर आली आहेत. सेंड विल्सेंट कॉन्व्हेंटचे पूर्वीचे नाव नवचैतन्य विद्यालय असे होते. त्या शाळेचे नाव बदलवून अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची माहिती आहे. या शाळेवर मेश्राम यांच्या पत्नी मुख्याध्यापक असल्याची माहिती आहे.