यवतमाळ: येथील किन्ही गावात सोमवारी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. व्ही-तारा ही कंपनी येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर तब्बल पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करून उद्योग उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे बेरोजगारांच्या नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
यावेळी जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी ८८१ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येवून या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यवतमाळ जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या मागास असल्याने येथे मोठे उद्योग आणि दळणवळणाची सुविधा देण्याची आग्रही मागणी या कार्यक्रमातून पालकमंत्री संजय राठोड यांनी केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ जिल्ह्यात व्ही-तारा ही कंपनी पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. या उद्योगामुळे येथील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यकत केला.
हेही वाचा… निवडणूक आयोग आता शाळेतच टिपणार नवमतदार
सोबतच यवतमाळला समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग ते यवतमाळ असा ८० किमीचा महामार्ग तयार करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास देत असल्याची घोषणाही या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केली. औद्योगिक विकासाच्यादृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, नागपूर या महानगरांशी वेगवान संपर्क होऊन दळणवळण, व्यापार व रोजगार वाढेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सोबतच यवतमाळ येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल बांधून तयार आहे. मात्र ही सुसज्ज इमारत अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी धूळखात पडून आहे. ती सुरू करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याने हा दवाखाना गोरगरीबांसाठी संजिवनी ठरणार आहे.
हेही वाचा… रेशन लाभार्थ्यांना उद्यापासून आनंदाचा शिधा! गोंदिया जिल्ह्यात २.२० लाख किट उपलब्ध
या सर्व घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होते, हे येणारा काळ सांगेल. मात्र या योजना साकारल्या तर यवतमाळ जिल्ह्यातील औद्योगिक मागासलेपण दूर होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री संजय राठोड यांना आता पाठपुरावा करून या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
शेतकऱ्यांना ‘झटका मशीन’
शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. शेतीसाठी आपत्तीकाळातील नुकसानभरपाईचे प्रमाण दुपटीवर नेले आहे. शेतक-यांना एक रूपयात पीक विमा देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. गत दोन वर्षांत ३५ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर २१ हजार शेतकऱ्यांना सौर झटका मशीन देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.