नागपूर : उपराजधानीत सूर्य कोपला असून येथील तापमान ४४.२ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. शहरातील नंदनवन, तहसील, लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) पाच अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वा नंतर त्यांचा मृत्यू झाल्याने हे मृत्यू उष्माघाताचा असल्याचा संशय आहे. परंतु शवविच्छेदन अहवालातूनच या मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

शहरातील तापमान वाढत चालले आहे. उन्हाशी संबंधित रुग्ण शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये नोंदवले जात आहे. २२ एप्रिलला सकाळी ७.३० वाजता नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत शीतला माता मंदिराच्या पाठीमागे एक अनोळखी ४५ ते ५० वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला पोलिसांकडून उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात हलवले गेले. परंतु, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

तहसील पोलीस ठाणे हद्दीतील अग्रसेन चौकात एक सुमारे ५० वर्षे वयाचा व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. पोलिसांकडून त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा २१ एप्रिलच्या दुपारी २ वाजता मृत्यू झाला. तर गांधीबाग कपडा मार्केट परिसरातही एक सुमारे ५० वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयो रुग्णालयात हलवले. परंतु त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील स्माॅल फॅक्ट्री परिसर, वर्धमाननगर परिसरातही २१ एप्रिलला दुपारी २.३० वाजता एक ५५ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात हलवले. परंतु, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले. लकडगंज पोलीस ठाणे हद्दीतील क्वेटा काॅलनीतील केटी वाईन शाॅप जवळच्या वीज वितरण पेटीजवळ एक ३२ ते ३५ वर्षे वयाचा व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयो रुग्णालयात हलवले, परंतु त्याचाही आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

या सगळ्याच प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, शहरातील तापमान वाढताच बेघर व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मृत्यूला उष्माघात जबाबदार राहण्याची शंका वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालानंतरच या सगळ्या मृत्यूंचे कारण स्पष्ट होणार असल्याचा महापालिकेचा दावा आहे.

महापालिकेकडे तीन संशयित मृत्यूंची नोंद

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागपूर शहरात आजपर्यंत ३ उष्माघात संशयितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, शवविच्छेदन अहवालातूनच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या आकडेवारीला महापालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.