चंद्रपूर:हरियाणा राज्यातील पिंजोर येथील गिधाड संवर्धन केंद्रातील पाच पांढरी गिधाडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा वनपरिक्षेत्रातील बोटेझरी येथील प्री-रिलीझ पक्षीगृहात यशस्वीरित्या सोडण्यात आली. गिधाड (जटायू) संवर्धन प्रकल्पाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्व पाचही गिधाडांचे ताडोबात यशस्वीरित्या स्थलांतरण करण्यात आले. ही पाचही गिधाडे अतिशय दुर्मिळ आहेत.

महाराष्ट्र वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सोडण्यात आलेल्या गिधाडांची प्रकृती सध्या चांगली आहे. रीवाइल्डिंग प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांचे वर्तन आणि हालचाल बारकाईने निरीक्षण केले जाईल. बोटेझरी येथे सोडण्यात आलेल्या पाच गिधाडांमध्ये तीन नर आणि दोन मादी गिधाडांचा समावेश आहेत, प्रत्येकाची वैयक्तिक ओळख आणि वय नोंदी आहेत.

नर गिधाडे एफ24 आहेत. त्याचे वय ६ वर्षे आहे, तसेच  एन१६ याचे वय दोन वर्षे तर एन७७ याचे वय १.४ वर्षे इतके आहे. दोन मादी गिधाडांमध्ये सहा वर्ष वयाच्या झेड२५ आणि ३ वर्षे वयाच्या झेड३४ यांचा समावेश आहे.

ताडोबा प्रकल्पात दुसऱ्यांदा गिधाडे सोडण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २०२४ मध्ये दहा गिधाडे सोडण्यात आली होती. त्यातील दोन गिधाडे एन १० आणि जे७४ जिवंत आहेत. ताडोबा प्रकल्प हा एक एक अग्रगण्य संवर्धन मॉडेल पैकी एक आहे. कारण हे अशा काही लँडस्केप्सपैकी एक आहे जिथे पांढरे-रम्पड गिधाडांची वन्य लोकसंख्या सध्या अस्तित्वात नाही.

गिधाडांची लोकसंख्या पूर्णपणे नाहीशी झाली आहे. अशा लँडस्केपमध्ये या गंभीरपणे धोक्यात आलेल्या प्रजातीची पुनर्प्रस्थापना आणि पुनर्स्थापना करणे हे येथे सुरू असलेल्या प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे. हा संपूर्ण प्रकल्प प्रधान मुख्य वनसंरक्षक  (वन्यजीव) श्रीनिवास राव, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष प्रविणसिंग परदेशी आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या देखरेखीखाली राबविला जात आहे.

डॉ. श्रावण सिंग, डॉ. काझवीन उमरीगर, हेमंत बाजपेयी, मयंक बर्डे, मनन महादेव, कोळसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर आणि त्यांच्या टीमने गिधाडांची सुरळीत वाहतूक आणि पक्षीगृहात सोडण्याची खात्री केली आहे अशी माहिती ताडोबा कोरचे उपसंचालक आनंद रेड्डी यांनी दिली.