वर्धा : उन्हाळ्यात सर्वत्र शुष्क वातावरण व पानगळ दिसण्याचे दिवस जवळ येत असताना केवळ एक वृक्ष आब राखून असतो. शिशिर मावळून वसंत ऋतू बहरायला सुरवात होत असताना पळस चमक दाखवायला सुरवात करतो. पळस म्हणजेच पलाश म्हणजेच रान अग्नी. इंग्रजीत त्यास फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हटल्या जाते. आता काळ्या रंगाच्या कळ्या येणे सूरू झाले असून काही वृक्ष तर फुलांनी बहरायला सुरुवात पण झाली. निष्पर्ण झाडावर फुलांचा मोहोर. फुलातील मध वेचण्यास मधमाशी व पक्षी डेरा टाकत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या आर्वी परिसरातील डोंगराळ भागात तसेच खरांगणा आर्वी घाट रस्त्यावर पळस कात टाकतोय. हा बहु्गुणी वृक्ष समजल्या जातो. फुलांपासून रंग ही सामान्य बाब. बारिक फांदया यज्ञात समिधा म्हणून वापरल्या जातात. प्राचीन काळापासून औषधी वनस्पती म्हणून त्यास मान्यता असल्याचे पर्यावरण प्रेमी अविनाश टाके हे सांगतात. पानापासून पत्रावळी तयार होतात. बियांचे तेल त्वचासाठी उपयुक्त मानल्या जाते. फुलांचा खरा बहर एप्रिल मध्ये सूरू होतो. नारिगी फुले जुलै पर्यंत छटा पसरतात. पण रंगच नव्हे तर या पळस वृक्षाची फुलं, पाने, खोडाचे साल हे औषधी गुणधर्म राखून आहेत.

प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. श्याम भूतडा म्हणतात की, पशुच्या उपचारात जनावरांना लवकर दुरुस्त करण्यासाठी पाळसाच्या सालीचा रस दिल्या जातो. घशातील खवखव कमी करण्यासाठी उकळत्या पाण्यात पाने टाकून गुरळा करणे उत्तम. पाळसाचे मूळ, साल याचा उपयोग बद्धकोष्ठ, मासिक पाळीचे विकार, तोंडाची दुर्गंधी दूर करणे असे बहुविध उपयोग असल्याचे डॉ. भूतडा सांगतात. उन्हाळ्यात शरीरास थंड करण्यासाठी याच्या पानाने अंघोळ करता येते. हा बहु्गुणी वृक्ष जतन करण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे, असे आवाहन अविनाश टाके करतात.

निसर्गाच्या प्रवाहात तग धरून राहण्यासाठी वनस्पती स्वतः समर्थ असतात. पण वाढत्या प्रदूषणामुळे समतोल बिघडत चालला आहे. पळस हा रानोमाळी टिकून राहलेला वृक्ष आहे. त्याचे आता संगोपन केले पाहिजे, अशी भावना व्यक्त होते.

प्लासीची लढाई ही पळसाच्या जंगलातच झाली होती, असा ऐतिहासिक ठेवा पण या झाडाशी जुळला आहे. पळसाला पाने तीन, अशी म्हण मराठीत रूळली आहे. पण त्या पानांना देखील त्रिदेवाचे महत्व असल्याचे म्हटल्या जाते.