नागपूर : उल्कापाताने ५० हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेले लोणार विवर कायम परदेशी अभ्यासकांसाठी संशोधनाचा विषय ठरले आहे. याच विवराने आता पुन्हा एक नवीन ओळख निर्माण केली आहे. मृत होण्याच्या वाटेवर असलेल्या लोणार विवराच्या संवर्धनासाठी ‘मी लोणारकर’ चमू सरसावली आणि अवघ्या तीन वर्षांत त्याचे परिणाम दिसून आले. या विवरावर पहिल्यांदाच २०१९ ला स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्षाचे आगमन झाले होते. या रोहित पक्ष्यांनाही आता लोणार सरोवराची भूरळ पडली असून ते सातत्याने या सरोवराला भेटी देत आहेत. ‘मी लोणारकर’ चमूचे सदस्य सचिन कापूरे यांनी यावर्षी देखील लोणार सरोवरात विहार करणाऱ्या रोहित पक्ष्यांची चित्रफित तयार केली आहे.

हेही वाचा : Video : ताडोबातील ‘‘अजीम-ओ-शान शहंशाह” कोण..?

पुरातत्त्व विभागाच्या आकांक्षा रॉय चौधरी यांना २५ नोव्हेंबर २०१९ला रोहित पक्ष्याचे अस्तित्व लोणार विवरात आढळून आले. याची खात्री करण्यासाठी ‘मी लोणारकर’चे सदस्य व पक्षी अभ्यासक विलास जाधव व संतोश जाधव यांनी २५ नोव्हेंबरला सकाळी या विवराची पाहणी केली. त्यावेळी हा पक्षी त्याठिकाणी होता. रोहित पक्षी काही विशिष्ट प्रकारचे शेवाळ खातात. त्यामुळे त्यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. वैशिष्टय़पूर्ण चोच असणाऱ्या या पक्ष्याला त्यामुळेच चिखलातील खाणे शोधणे सोपे जाते. याच चोचीने ते चिखलाचे घरटे बनवतात. असा हा पक्षी लोणार विवरावर आढळून आल्याने ‘मी लोणारकर’च्या चमूला या विवराच्या संवर्धनाच्या कामात आलेले यश आहे. बेसॉल्ट खडकातील हे एकमेव विवर १७० मीटर खोल आणि ६.५ किलोमीटर परिघाचे आहे. यामुळेच परदेशी पर्यटक, संशोधक येथे अभ्यासासाठी येतात. मात्र, शासनाने या विवराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हे विवर डबक्याच्या दिशेने वाटचाल करत होते. लोणारच्याच काही तरुणांना ही अवस्था पाहवली नाही आणि प्रत्येक शनिवार व रविवार त्यांनी विवराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू केले.

विवराच्या संवर्धनाची धुरा हाती घेतल्यामुळे हा परिसर प्लास्टिकमुक्त होत आहे. परिसरातील सर्व मंदिरसमूह संरक्षित करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पावले उचलली आहेत. हे विवर लोणार अभयारण्यात येत असले तरी त्याची धुरा प्रादेशिक वनविभागाकडे होती. मी लोणारकरने अभयारण्याची धुरा वन्यजीव विभागाकडे देण्याची मागणी लावून धरली आणि जून २०१९ ला या अभयारण्याचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे सोपवण्यात आले. त्यामुळे या विवराला आणखी अभय मिळाले. भविष्यात या विवरावर आणखी नवे पक्षी येतील, अशी अपेक्षा मी लोणारकर चमूने व्यक्त केली.

Story img Loader