आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, भारतात यंदा पहिल्या सव्वातीन महिन्यातच ३९ वाघांचा मृत्यू झाला. यात गेल्या वर्षीप्रमाणेच वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मध्यप्रदेश १४ वाघांच्या मृत्यूसह पहिल्या क्रमांकावर, महाराष्ट्र दहा वाघांच्या मृत्यूसह दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक सहा वाघांच्या मृत्यूसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्र संरक्षणातील त्रुटीच  यामुळे उघड झाल्या आहेत.

संरक्षण, सुरक्षा आणि देखरेखीसाठी केंद्र तसेच राज्य सरकार दरवर्षी मोठय़ा प्रमाणात खर्च करत असतानाही वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी वाढत आहे.  वाघांच्या ३९ मृत्यूंपैकी आठ वाघांचे बछडे (पाच नर, तीन मादी) आहेत. २० वाघ असून नऊ वाघिणींचा समावेश आहे. दोन मृत्यूंमध्ये वाघ की वाघीण हे स्पष्ट झालेले नाही. वाघांच्या मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीनंतर केंद्र सरकारने व्याघ्रसंवर्धनावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जानेवारी ते मे या कालावधीत वाघांचे मृत्यू मोठय़ा प्रमाणात होतात. अवघ्या तीन महिन्यातील वाघांच्या मृत्यूची ही आकडेवारी पाहता आणि उन्हाळय़ातील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण पाहता व्याघ्रसंवर्धनासाठी केंद्र तसेच राज्य सरकारला गांभीर्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

शिकाऱ्यांना मोकळे रान..

उन्हाळय़ात तीव्र हवामानाचा परिणाम गस्तीवर होतो. वसंत ऋतूत पानगळतीमुळे जंगलातील दृश्यमानता इतर ऋतूंच्या तुलनेत अनेक पटींनी वाढते. तसेच उन्हाळय़ात वन्यप्राणी पाणवठय़ाजवळ जास्तीत जास्त वेळ असतात. त्यामुळे शिकाऱ्यांनाही सोपे जाते.

सलग दुसरे वर्ष..

२०२१ मध्ये देखील पहिल्या तिमाहीत ३९ वाघांचा मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी  ३९ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. उन्हाळय़ात विविध कारणांमुळे वाघ तसेच इतर प्राण्यांच्या मृत्यूसंख्येत झपाटय़ाने वाढ होते.

मृत्युकारण अनुपलब्ध..

राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने त्यांच्या संकेतस्थळावर वाघांच्या मृत्यूचे कारण देताना केवळ दोन प्रकरणात नैसर्गिक मृत्यूचे कारण दिले आहे. उर्वरित ३७ प्रकरणात वाघांच्या मृत्यूचे कारणच दिलेले नाही.

दखल आवश्यक..

महाराष्ट्रात बहेलिया शिकाऱ्यांची हालचाल गेली काही वर्षे बंद होती, पण मागील वर्षांत त्यांच्या राज्यातील हालचाली पुन्हा जाणवल्या आहेत. त्याची दखल घेणे तातडीने आवश्यक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flaws tiger protection exposed tigers die three months ysh