लोकसत्ता टीम
नागपूर : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या एका प्रवाशाला अपस्मारचा झटका आल्याने विस्ताराचे विमान नागपुरात गुरुवारी वैद्यकीय आपातकालिन स्थितीत (इमजरन्सी लँडिंग) उतरवण्यात आले.
विनयकुमार गोयल (वय ४४) हे विस्ताराच्या विमानाने दिल्लीहून हैदराबादला निघाले होते. विमान हवेत असताना त्यांना अपस्मारचा झटका आला आणि ते पडले. त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे वैमानिकाने नागपुरात इमरजन्सी लँडिंग केले. गोयल यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक व्हीके८२९ या विमानाने दिल्लीहून हैदराबाद प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हवाई प्रवासादरम्यान अपस्मारचा झटका आला. प्रवाशाची बिघडलेली प्रकृती पाहता विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळविण्यात आले. सध्या या प्रवाशावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात किम्स-किंग्ज्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लाक्षणिक उपोषणाचा इशारा का द्यावा लागला? जाणून घ्या…
विनय कुमार गोयल (वय ४४) असे या प्रवाशाचे नाव आहे. गोयल हे विस्तारा एअरलाइन्सने हैदराबाद येथे जात होते. दरम्यान, त्यांना मिरगीचा झटका आला. यामध्ये त्यांचा खांदा निखळला. तसेच जीभ दाताखाली चावल्या गेली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत आपात्कालीन लॅण्डिंग झाले. विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने प्राथमिक तपासणी करून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. सध्या गोयल यांच्यावर मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक उत्तरवार यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहे.
डॉ. उत्तरवार म्हणाले,‘गोयल यांना मेंदूशी संबंधित इडिओपॅथीक इंट्राक्रॅनिअल हायपरटेन्शन (आयआयएच) हा आजार आहे. त्यावर चंदीगड येथे गोयल उपचार घेत आहेत. दरम्यान, हवाई प्रवास करताना त्यांना अचानक फिट्स आल्यात आणि त्यांची प्रकृती खालावली. इस्पितळात दाखल करण्यात आले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. येथे त्यांचे स्कॅनिंग करण्यात आले असून मेंदूच्या नसेत क्लॉट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती स्थिर असून परवा सुटी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वैद्यकीय कारणाने आपात्कालीन लॅण्डिंग झालेले हे विमान काही वेळाने उर्वरित प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले.