अमरावती : अमरावती ते मुंबई या बहुप्रतीक्षित विमानसेवेच्या शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या १६ एप्रिलला अमरावती विमानतळावरून अलायन्स एअरचे विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. याच दिवशी विमानसेवेचा शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अलायन्स एअरने आपल्या ७२ आसनी विमानसेवेसाठी १६ एप्रिलनंतरच्या तारखांचे बुकिंग अद्याप सुरू केले नसले, तरी येत्या काही दिवसांत विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. या विमानसेवेची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. १६ एप्रिलला सकाळी ११.३० वाजता मुंबईसाठी विमान उड्डाण होणार आहे. अमरावती विमानतळावर गेल्या महिन्यात ‘एअर कॅलिबरेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेटर’ अर्थात ‘पीएपीआय’ चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरूहून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर उड्डाण केलेल्या बीच एअर ३६० ईआर टर्बोप्रॉप विमानावर भारतीय विमानतळ प्राधिकरण, फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने कॅलिब्रेशन केले. या विमानाने २६/०८ धावपट्टीवरून अमरावती विमानतळावरून उड्डाण केले आणि त्याचे कॅलिब्रेशन यशस्वीरित्या पूर्ण केले होते.

अमरावती विमानतळावर नवीन धावपट्टी तयार करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. १८ बाय ५० मीटरची ही धावपट्टी आहे. त्यामुळे येथून एटीआर हे ७२ आसनी विमान उडणार आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर अलायन्स एअर या कंपनीच्या माध्यमातून एटीआर ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळ आता प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाले आहे.

अद्याप विस्तृत वेळापत्रक जाहीर झाले नसले, तरी अमरावतीकर विमानसेवा सुरू होण्याची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करीत आहेत. अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर प्रवासाची तारीख दर्शविण्यात आली असली, तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी बुकिंग सध्या उपलब्ध नाही. ही विमानसेवा अमरावतीच्या विकासात मोठी भूमिका बजावणार असून अमरावती ते मुंबई हा शुभारंभाचा पहिला विमान प्रवास मी अलायन्स एअरच्या विमानाने करणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते दिनेश सूर्यवंशी यांनी दिली. ही विमानसेवा सुरू केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

अमरावती विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज झाले असून अलायन्स एअरकडून वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. पहिले विमान उड्डाण येत्या १६ एप्रिलला होणार आहे, अशी माहिती अमरावती विमानतळाचे व्यवस्थापक गौरव उपश्याम यांनी दिली.