नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख शहरांदरम्यान लवकरच विमानसेवा सुरू होत असल्याने राज्यातील हे दोन प्रदेश अधिक जवळ येणार आहेत. स्टार एअरची नागपूर ते नांदेड ही सेवा येत्या २७ जूनपासून आणि इंडिगो एअरलाइन्सची नागपूर- छत्रपती संभाजीनगर येत्या २ जुलैपासून विमानसेवा सुरू होत आहे.
स्टार एअरने नागपूर ते नांदेड विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा २७ जूनपासून सुरू होत असून आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस राहणार आहे. नागपूर ते नांदेड विमान नागपूरहून सकाळी ९.१५ वाजता निघेल आणि नांदेडला १०.०५ वाजता पोहोचेल. नांदेडहून दुपारी १.१० वाजता विमान निघेल आणि दुपारी २ वाजता नागपुरात पोहोचेल.
हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता एका ‘क्लिक’वर, गैरप्रकाराला…
इंडिगो एअरलाइन्सची येत्या २ जुलैपासून ही विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ही विमासेवा राहणार आहे. फ्लाइट क्रमांक ६ई-७४६२ हे विमान नागपूरहून सकाळी ९.४० वाजता उड्डाण भरेल आणि छत्रपती संभाजीनगरला सकाळी ११ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे फ्लाइट क्रमांक ६ई-७४६७ विमान छत्रपती संभाजीनगरहून दुपारी ४.४० वाजता उड्डाण घेईल आणि ६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही विमानसेवा व्हाया छत्रपती संभाजीनगर नागपूर-गोवा आणि गोवा-नागपूर अशा स्वरुपाची असणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातील महत्त्वाची आर्थिककेंद्रे म्हणून नागपूर आणि औरंगाबादला पाहता येईल. या दोन्ही शहरादरम्यान होणारे दैनंदिन आवागमन लक्षणीय असे आहे. प्रामुख्याने नागपूरहून औरंगाबाद वा औरंगाबादहून नागपूरला येण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सचा उपयोग करण्यात येतो. या प्रवासात किमान बारा तासांचा कालावधी लागतो. त्याशिवाय एसटी बसनेदेखील प्रवासी जातात. त्यांना बारा ते तेरा तासांचा प्रवास करावा लागतो.
हेही वाचा – निवडून येताच प्रतिभा धानोरकरांनी दिला राजीनामा, आता नवीन जबाबदारी
नागपूरहून औरंगाबादसाठी थेट रेल्वेसेवा नाही. ज्या काही थोड्या रेल्वे औरंगाबाद येथे थांबतात, त्याने प्रवास करणे अधिक कठीण आणि वेळखाऊ आहे. त्यामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसपेक्षाही अधिक वेळ जातो. त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स बसने रात्रीच्या वेळी प्रवास करतात. या सर्व समस्या आता विमानसेवेमुळे दूर होणार आहे. नांदेड ते नागपूर ५० मिनिटांचा आणि नागपूर ते संभाजीनगर अवघ्या एक तासात हा प्रवास पूर्ण होणार असल्याने प्रवासी सुखावले आहे.