चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहाटेपासून सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे चंद्रपूर शहरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने चंद्रपूर – राजुरा, घुगुस – चंद्रपूर, वरोरा – वणी – यवतमाळ मार्ग बंद झाला आहे. इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी पहाटे अडीच वाजतापासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. राजकला सिनेमागृहाच्या मागील भागात नाल्याचे पाणी निघण्यास मार्ग नसल्याने हा रस्ता बंद झाला आहे. शेकडो घरात पाणी शिरले आहे. गटारे व नाले सफाई झाली नसल्यामुळे नाले तुंबून रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. शेकडो नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामानांची मोठ्या प्रमणात नासधूस झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

हेही वाचा – राज्यातील सर्वच भागांत आज अतिवृष्टीचा इशारा

गंज वॉर्ड, श्री टॉकीज, तुकुम तथा वाहतूक पोलीस शाखा कार्यालय, हॉटेल सिद्धार्थ या भागात रस्त्यावर पाणी आहे. तसेच जलनगर, महसूल कॉलनी, सिस्टर कॉलनी, वडगाव, नगिनाबाग, रामनगर, बिनबा गेट, पठाणपुरा, नागपूर रोड, रहमत नगर, लखमापूर, अंचलेश्वर गेट या भागात अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले आहे. पठानपुरा गेटच्या बाहेर पाणी आल्याने राजनगर, सहारा कॉलनी पाण्याखाली आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे. नदीकाठावरील रहमतनगर या खोलगट भागातील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील लोकांना इतरत्र हलविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा – “महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार”; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

काही समाजमाध्यमांवरून शुक्रवार २८ रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा संदेश व्हायरल होत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून २८ जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर

इरई धरणाचे २ दरवाजे उघडले

जिल्हा प्रशासनाने आज सकाळी १० वाजता इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले आहे. त्यामुळे इरई नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. इरई नदी तथा नाल्यालगतच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील अनेक वस्त्यांमधील लोक आता घर सोडून बाहेर पडत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood due to heavy rain many settlements in chandrapur city under water hundreds of houses flooded roads closed rsj 74 ssb
Show comments