यवतमाळ : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. आता गावगावांत वेदनांचा पूर आला असून, संसार सावरण्याचे आव्हान पूरग्रस्तांसमोर निर्माण झाले आहे. शासनाची पाच हजारांची मदत तोकडी ठरत आहे. पूरग्रस्त गावांमध्ये नेते, अधिकाऱ्यांचे पाहणी फोटोसेशन संपल्यानंतर पीडित प्रत्यक्ष मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी रात्री आलेला पूर ओसरला असला तरी त्या रात्रीच्या काळ्याकुट्ट आठवणी अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. घरातील भांडीकुंडी वाहून गेली. अंगावर कपडे तितके शिल्लक आहेत. घरातील गाळ साफ करताना पीडितांची तारांबळ उडते आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी गावातील रस्त्यावरून थेट घरात शिरले. जिवाच्या आकांताने नागरिकांना घराच्या छतावर आसरा घ्यावा लागला. महागाव तालुक्यातील अनंतवाडीसह, यवतमाळ, केळापूर, घाटंजी, दारव्हा, दिग्रस आदी तालुक्यांना चांगलाच फटका बसला.

हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून सहा ठार, नऊ जखमी; वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी

अतिवृष्टीमुळे तब्बल २५४ गावे बाधित झाली. ६०० वर कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागले. यात एक हजार ४७२ घरांची अंशत: तर २७५ घरांची पूर्णत: पडझड झाली. पुराच्या पाण्यात घरातील भांडीकुंडी, किराणा साहित्य, मुलांचे पुस्तके, शासकीय कागदपत्रे वाहून गेली. घरातील साहित्य पुरात वाहून जात असताना पीडितांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. स्वत:सह मुलांचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षित जागेचा आधार शोधावा लागला. आता पूर ओसरल्यावर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, घरात चिखलाशिवाय काहीच दिसत नाही. चिखल काढताना पीडितांच्या डोळ्यातील पूर काही केल्या थांबताना दिसत नाही. मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागात दौरे करून पीडितांना मदतीचे आश्‍वासन दिले. मात्र, त्यातून समाधानाशिवाय पीडितांना काहीही मिळाले नाही.

हेही वाचा >>> बुलढाणा: मटन मार्केटला आग, लाखोंचे नुकसान; मेहकरमध्ये खळबळ

दरम्यान, आश्वासनानंतरही हाती काहीच न आल्याने वाघाडी येथील पूरग्रस्त नागरिक आज, बुधवारी रस्त्यावर उतरले.

शेतकऱ्यांच्या स्वप्नांची धूळधाण

अतिवृष्टीच्या पावसात नदी-नाल्यांचे पाणी थेट शेतात शिरले. त्यामुळे पाण्याच्या लोंढ्यात शेती खरडून गेली. हजारो हेक्टर क्षेत्रात कुठेही पीक शिल्लक नाही. शेतीची विदारक अवस्था झाल्याने शेतकऱ्यांत त्राणही उरला नाही. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी लावलेले कापूस, सोयाबीन, तूर कुठेही दिसत नाही. या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचीच धूळधाण केली. त्यामुळे मुलांचे शिक्षण, आजारपण, उदरनिर्वाह, आदी प्रश्‍नांनी शेतकरी चिंताग्रस्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood hit villagers in yavatmal district protest on road for government help nrp 78 zws
Show comments