राजेश्वर ठाकरे,लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : अंबाझरी तलावाच्या विसर्गाचा भाग अरुंद करणे, वाहनतळासाठी चक्क नदीवर ५० फुटांचे सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यासारखे प्रकार नागपूर सुधार प्रन्यास आणि बड्या व्यावसायिकांनी सत्ताधाऱ्यांच्या मदतीने केले आहे. यामुळे उत्तर अंबाझरी मार्गावरील अंबाझरी ले-आऊट, डागा ले-आऊट, कॉर्पोरेशन कॉलनी या वस्तांमध्ये पुराचे पाणी शिरले आणि कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> राज्यात शांतता राखण्यात फडणवीस अपयशी – नाना पटोले

क्रेझी कॅसल ॲक्वा पार्कच्या मालकाने नदीपात्रावर अतिक्रमण केले. त्यामुळे नदीची रुंदी कमी झाली. तर एनआयटीला लागून असलेल्या डागा ले-आऊटमध्ये नाग नदीजवळ नागपूर सुधार प्रन्यासने ‘स्केटिंग ग्राऊंड’ उभारले आहे. या ग्राऊंडच्या वाहनतळासाठी अंबाझरी तलावाकडून येणाऱ्या नाग नदीवर सिमेंट काँक्रिटचे स्लॅब टाकण्यात आले आहे. शुक्रवारी उत्तर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अंबाझरी तलावातून अचानक विसर्गाचे पाणी वाढले आणि हे या स्लॅबमुळे अडले. परिणामी डागा ले-आऊट आणि कॉर्पोरेशन कॉलनीमधील घरांमध्ये पाणी शिरले. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, स्केटिंग ग्राऊंडवरील पार्किंगच्या नावाने नाल्यावर नियमबाह्य स्लॅब टाकण्यात आले. या नाल्याचा अडथळाही पुराला जबाबदार आहे. अद्याप येथे एकही वाहन पार्किंग झाले नसताना तो तोडण्याचे नियोजन आहे. एनआयटीचा पैसा वाया घालवण्याला कोण जबाबदार आहे, याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे.

हेही वाचा >>> सर्व शाखीय कुणबी समाजाचा सरकारच्या बैठकीवर बहिष्कार

तत्कालीन सभापतींनी दिली परवानगी

नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतीच्या निवास्थानासमोर सेंट्रल मॉल आहे. ते अगदी नदीला लागून आहे. नियमानुसार बांधकाम झाले नाही. नदीला धोका असल्याचे सांगून नासुप्रने नोटीस बजावली होती. परंतु, नंतर तत्कालीन सभापती प्रवीण दराडे यांनी काही अटींवर मॉलच्या भागात व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली.

वाहनतळ पाडणार

क्रेझी कॅसल ॲक्वा पार्क असलेली जागा आता मेट्रोकडे देण्यात आली आहे. डागा ले-आऊटमध्ये स्केटिंग ग्राऊंड, वाहनतळ २५ वर्षांपासून बांधण्यात आले होते. नाग नदीवरील वाहनतळ तोडण्यात येईल. सेंट्रल मॉलच्या काही भागाला परवानगी आहे. तेथील हॉटेलच्या बांधकामास परवानगी नाही.

– मनोजकुमार सूर्यवंशी, सभापती, नासुप्र.

आवश्यक उपाययोजना करणार

क्रेझी कॅसल ॲक्वा पार्क एका खासगी कंपनीकडे होती. आता मेट्रो तेथे सौंदर्यीकरण करीत आहे. अंबाझरी तलावाचा विसर्ग योग्यप्रकारे व्हावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल. – अखिलेश हळवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood in nagpur due to dumping of 60 feet slab for parking on nag river rbt 74 zws