नागपूर : तीव्र उन्हाळ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात यंदा अवकाळी पावसामुळे चक्क उन्हाळय़ात नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. यामुळे रब्बी पीक आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. पुढचे काही दिवस अशीच स्थिती राहण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस सुरू आहे. वाशीमसह यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेलोरा नदीला रविवारी पूर आला. यवतमाळ व अकोला जिल्ह्यातील नालेही दुथडी वाहू लागले. एप्रिल महिन्यात पावसाळय़ासारखे चित्र विदर्भात पाहायला मिळत आहे. अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून काही भागांत घरांची पडझड झाली. नदी, नाले दुथडी भरून वाहत असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. बार्शीटाकळी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कक्षांमध्येदेखील पाणी शिरल्याने रुग्णांचे हाल झाले. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस आदी भागांत गारपीट झाले. बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून १६ बकऱ्या ठार झाल्या तर वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात गारपीट झाल्याने पिकांची हानी झाली.