नागपूर : नागपूरमध्ये पूर येऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. मदत व पूनर्वसन मंत्री नागपूरला येऊन गेले. ३ ऑक्टोबरपासून पूरग्रस्तांना मदत वाटप सुरू होईल, असे सांगितले होते. पण प्रशासन म्हणते ५ ऑक्टोबरपासून मदत मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अतिवृष्टीमुळे २३ सप्टेंबरला नदी, नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्पुरती मदत म्हणून शासनाकडून १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मदत देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून बुधवारी किंवा गुरुवारी प्रत्यक्ष मदत पूर बाधितांच्या बँक खात्यात जमा होईल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा – चुकीला माफी नाही! एक चूक पडणार कोटी रुपयांची; नेमका काय आहे प्रकार? वाचा सविस्तर…

पहिल्या टप्प्यात १० हजार घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, पुराची तीव्रता अधिक असल्याने पूरपीडितांची संख्या २५ हजार कुटुंबांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १७ हजारांचा अंदाज व्यक्त केला होता. आतापर्यंत २२ हजारांच्यावर पंचनामे झाले. मंत्री अनिल पाटील यांनी ३ ऑक्टोबरपासून अनुदान वाटप सुरू केले जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच लाखांचे देयक कोषागाराकडे सादर करण्यात आले आहे. शासनाकडून पूरपीडितांसाठी रक्कम कोषागाराकडे पाठवण्यात आली आहे. कोषागार कार्यालय ही रक्कम बँकेकडे वळती करेल व त्यानंतर बँकेमार्फत पीडितांच्या खात्यात ती वळता होईल. बुधवारी दुपारनंतर किंवा तांत्रिक कारण आल्यास गुरुवारपासून पूरबाधितांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. ५ हजार कुटुंबांनाही ही मदत पोहोचता होईल, असे नागपूरचे तहसीलदार संतोष खंडारे यांनी सांगितले. २३ सप्टेंबरला महानगरात निर्माण झालेल्या परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी सध्या १८० कर्मचाऱ्यांच्या ५० चमू कार्यरत आहेत. शहराच्या सीमावर्ती भागातील पंचनामे सध्या सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

हेही वाचा – अकोला : ई-पीक प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्र्यांना बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..

दरम्यान, आतापर्यंत २२ हजार पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. ज्यांचे पंचनामे झाले नाही त्यांनी संयम ठेवावा, प्रशासनाकडून सर्वांचे पंचनामे करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहे. पंचनामे करण्यात आलेल्या खातेधारकांनी रक्कम खात्यात जमा झाली किंवा नाही याबाबतची खातरजमा करावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood victims in nagpur await relief cwb 76 ssb
Show comments