यवतमाळ: शहरालगतच्या वाघाडी नदीच्या काठावर वसलेल्या वस्तीसाठी २१ जुलैची रात्र काळरात्र ठरली. पुरामुळे या वस्तीतील १०५ घरांची पूर्णतः वाताहत झाली. मात्र त्या रात्रीपासून सुरू झालेला संघर्ष वस्तीत अजूनही सुरू आहे. पूर आसेरला मात्र त्यानंतर उद्भवलेल्या विविध समस्यांनी येथील नागरिकांच्या वेदना कायम आहेत. प्रशासनाने काही पूरग्रस्तांना पाच हजार रूपयांची मदत करून हात झटकल्याने विविध सामाजिक संस्थांच्या आधाराने येथील पूरग्रस्त दिवस काढत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुराच्या दोन आठवड्यानंतरही या वस्तीत नगर परिषद प्रशासन पोहोचले नाही. वस्तीत पुरामुळे झालेला चिखल, वाहून आलेले साहित्य विखुरले आहे. जलस्रोत दूषीत झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यात अद्यापही ब्लिचिंग पावडर प्रशासनाने टाकले नाही. नगर परिषदेकडून सफाई न झाल्याने वस्तीत रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा… भावना टिपायला लेखक पोहोचला रेल्वे स्थानकात, पण पोलिसांनी उचलले अन….

अनेकांची घरे पडली. घरातील धान्य, वस्तू, अंथरूण, पांघरून, कपडे, पैसे सर्वस्व वाहून गेले. त्यामुळे अनेक कुटुंब अद्यापही गृहरक्षक दलाच्या आवारात मुक्कामास आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था काही सामाजिक संघटना लोकसहभागातून करत आहे. मात्र या सर्व समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील पूरग्रस्तांनी केला. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री संजय राठोड यांनी या भागात दौरा केल्यानंतर मदतीचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात प्रशासनाने या गावाला वाळीत टाकल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

हेही वाचा… स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी!

पूर ओसरून १५ दिवस होत आले असताना अद्यापही परिसरात साधे आरोग्य शिबीर घेण्यात आलेले नाही. येथील नागरिक नगर परिषदेचा कर भरत असताना नगर परिषदेकडून साफसफाई, रस्यां्षची डागडूजी, दुषीत पाण्याचे शुद्धीकरण, वीज दुरूस्ती अशी कुठलीच कामे करण्यात आली नाही. केवळ अंगावरच्या कपड्यांसह येथील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. पुस्तके वाहून गेल्याने मुलं शाळेत जात नाहीत. वस्तीतील बहुतांश नागरिक रोजमजुरी करतात. मात्र वाहून गेलेले घर कसे उभे करायचे या चिंतेत अनेकांचा रोजगार बुडत आहे. काही नागरिकांचा व्यवसाय आहे. त्यांचे साहित्य वाहून गेल्याने हे कारागिर बेरोजगार झाले आहेत. वस्तीत पुरानंतर समस्यांचा पूर आला असताना प्रशासनाने हात झटकल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

लोकसहभागातून मदत

वाघाडी येथील पूरग्रस्तांकडे प्रशासनाने पाठ फिरवली असताना विविध सामाजिक संघटना मदत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. या संस्था धान्य, कपडेलत्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, दोन वेळेचे भोजन पूरग्रस्तांना उपलब्ध करून देत आहे. आता या पूरग्रस्तांची घरे उभी राहावी म्हणून मदत केली जाणार आहे. कोणी सिमेंट, कोणी टिनपत्रे, लाकूडफाटा आदी बांधकाम साहित्य देण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. १५ ऑगस्टपर्यंत येथील पडलेली घरे उभी राहावी, असा संकल्प सामाजिक संघटनांचे समन्वयक प्रा. घनश्याम दरणे, सुरेश राठी, माँ दुर्गा उत्सव मंडळ वाघापूरचे चंद्रकांत राऊत, चेतना राऊत, सेवा समर्पणचे प्रशांत बनगीनवार, अनंत कौलगीकर, विजय देऊळकर, निस्वार्थ फाउंडेशनचे अनिकेत नवरे, प्रवीण इंझाळकर, अर्पित शेरेकर, किशोर बाभूळकर, परशुराम कडू आदींनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Floods in waghad near yavatmal administration has helped five thousand rupees nrp 78 dvr
Show comments