अकोला : ‘फुलोंके रंगसे…’ अशा शब्दांनी साहित्यिक, कवींपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुले, ही निसर्गाची एक सुंदर रचना. नयनरम्य, सुंदर, सुवासिक, रंगीत फुलांचे सर्वांनाच विशेष आकर्षण. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र विभागाच्या फुलशेतीच्या विविध प्रक्षेत्रातली बहरुन आलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे.

सदिच्छा आणि शुभेच्छांचे ‘टोकन’ असलेल्या फुलांची शेती आणि त्यातून मिळणारे आर्थिक उत्पादन या व्यतिरिक्त फुलांची सजावट, विक्री, फुलमाळा बनवणे यातून एक मोठी चलनाची ‘माळ’ गुंफली जाते. गुलाब, कमळ, झेंडू, एस्टर, वॉटरलिली, लिली, डेझी, गेलार्डिया, झेंडू, हिवाळी हंगामातील पेटुनिया, वर्वेना, गॅझेनिया, पेंटास, बिगोनिया, डायनथस, झिनिया, विंका आदींसह अनेक देशी विदेशी फुलांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाची फुलशेती सध्या बहरली आहे. सध्या गुलाब, झेंडूचा बहर आला आहे. विविध रंगी, आकारांने वैविध्यपूर्ण फुलांचे दृष्य नयनरम्य ठरत आहेत. सोबतच एस्टर, वॉटरलिली, लिली, डेझी, गेलार्डिया, झेंडू, हिवाळी हंगामातील विविध प्रकारच्या फुल पिकांची लागवड करून त्यांच्या विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यावर संशोधन केले जाते.

पुष्पगुच्छ, माळा तयार करण्यापासून ते विविध प्रयोजनांना फुलांची सजावट ही कार्यक्रमाची शोभा वाढवते. केवळ फुल शेतीच नव्हे तर या प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व घटकांना त्यातून रोजगार उपलब्ध होत असतो. या केंद्रात १० एकरहून अधिक क्षेत्रात विविध फुलांची लागवड करण्यात आली आहे. विविध प्रजाती विकसित करुन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे वाण तयार केले जातात. फुलशेती, बाग विकसित करण्यासाठी प्रशिक्षित माळी तयार करणे असे विविध अभ्यासक्रमही येथे चालवले जातात.  त्यातून फुलांची शेती, हरितगृहात फुलशेती, निर्यातक्षम फुलांचा विकास आदींचे धडे मिळतात. 

फुल पिकांचे ३१५ शोभिवंत प्रकार

उद्यानविद्या महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर दोन दिवसीय शिवारफेरी, चर्चासत्र आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. यामध्ये २१ विविध भाजीपाला पिकांचे ३४ वाण २० एकर क्षेत्रावर तसेच १७ विविध फळ पिकांचे ३४ वाण २०० एकर क्षेत्रावर आणि २३ विविध फुल पिकांचे ३१५ शोभिवंत प्रकार १० एकर क्षेत्रावर असे एकूण २३० एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक ५८ पिकांचे ३८३ पीक प्रात्यक्षिक सर्व तंत्रज्ञानासह शेतकऱ्यांनी जाणून घेतले.

Story img Loader