नागपूर : तापमानातील चढउतार आणि हवामानातील अचानक होणारा बदल यामुळे उपराजधानीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळा तापत आहे असे वाटत असतानाच हवामान खात्याने पावसाचाही इशारा दिला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात प्रचंड तफावत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
हेही वाचा >>> नागपूर : मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार
गेल्या काही वर्षात निसर्गाचे चक्र पूर्णपणे पालटले आहे. उपराजधानीत उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची उदाहरणे आहेत. ऐन मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याची देखील उदाहरणे आहेत. हवामान खात्याने मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. उपराजधानीत तो बऱ्याच अंशी खरा ठरला. फेब्रुवारीच्या अखेरीस दिवसाचे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मार्चची सुरुवात मात्र ढगाळ वातावरणाने झाली. गेल्या दोन दिवसांपासून पहाट ढगाळ वातावरणाने होते. त्यानंतर उन्हाचा तडाखा, सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण असे हवामानाचे चक्र सुरू आहे. त्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाने नागपूरकर हैराण झाले आहेत. थंड वातावरणातून उष्ण वातावरणात प्रवेश करण्याची वेळ म्हणजे मार्च महिना आहे. या महिन्यात तापमान ३६.४ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक असते. यावर्षी मात्र फेब्रुवारी महिन्यातच अशा तापमानाची नोंद झाली आहे. या महिन्यात कमाल आणि किमान तापमानातही मोठे अंतर असते. तब्बल दुपटीने हा फरक आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले असताना किमान तापमान अजूनही १५ ते २० अंश सेल्सिअसच्या मध्ये आहे. हवामान खात्याने सहा ते सात मार्चदरम्यान पावसाचीही शक्यता नोंदवली आहे.
हेही वाचा >>> मेट्रो विरुद्ध ‘आपली बस’; काय आहे राजकारण?
मार्च महिन्यातील तापमानाचा आलेख उपराजधानीत २८ मार्च १८९२ साली सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. ४ मार्च १८९८ला ८.३ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमी तापमान नोंदवण्यात आले. याच मार्च महिन्यात १९५७ साली १०४.२ मिलीमीटर पाऊस पडला. २६ मार्च १८८१ साली २४ तासात सर्वाधिक पाऊस ४५ मिलीमीटर पडला. मार्च महिन्यात नागपुरातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ३१ मार्च २०१७ व ३१ मार्च २०१९ ला ४३.३ अंश सेल्सिअस इतकी तर किमान तापमानाची नोंद तीन मार्च २०१३ ला १०.५ अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली.