नागपूर : नागपूर उड्डाण पुलाचे शहर, जुने पुल तोडले जातात. नवीन बांधले जातात. काहींची कामे पूर्ण होते. काही वर्षानुवर्षे अपूर्ण राहतात. नागपुरातील पारडीतील उड्डाण पूल हा अशा रेंगाळलेल्या पुलांपैकीच एक. विशेष म्हणजे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ विलंबानंतर या पुलाचा काही भाग मंगळवारी १८ सप्टेंबरनंतर वाहतुकीसाठी खुला होतो आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पारडी येथील उड्डाणपुलाची पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या चारपैकी तीन बाजूंचे काम पूर्ण झाले असून येत्या १९ तारखेपासून तीन बाजू वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
पारडी उड्डाणपूल प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याची अनेक कारणे दिली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आवश्यक असलेली जमीन वेळेत उपलब्ध करून देण्यात आली नाही. १.१८ हेक्टर जागेवर उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि मेट्रो विभागाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाला. पुलाच्या बांधकामादरम्यान वाहतुकीची समस्याही एक कारणीभूत ठरली. याशिवाय भूमिगत जलवाहिनी, इलेक्ट्रिक केबल, बीएसएनएल केबल, सीवरेज लाईन आदींचे नियोजन करण्यास बराच कालावधी लागला आहे. पुलाचे ३.५ किमी आणि ७.५ किमी. दोन सिमेंट रस्ते तयार आहेत.