नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने बांधलेला पूर्व नागपुरातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी खचल्याने खळबळ उडाली. या पुलाचा प्लास्टर आणि सिमेंट काँक्रीटचा तुकडा एका कारवर कोसळला, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पारडी उड्डाणपूल काल, गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले होते. आज सकाळी या पुलाचे प्लास्टर खचल्याची बाब समोर आली. कामठी मार्गावरील एका निर्माणाधीन पुलाचा भाग काही दिवसांपूर्वी खचला होता. शहरात सर्वत्र उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पण, त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील बुटीबोरी उड्डाणपूलही दीड महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे खचला होता. त्या पुलाची अद्याप दुरुस्ती झालेली नाही.

पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. भूमिपूजनाला सुमारे साडेनऊ वर्षे झालीत. बांधकाम सुरू होऊन साडेसात वर्षे पूर्ण झालीत. पारडी उड्डाणपुलाचे पूर्ण करण्याची अंतिम मुदत एनएचएआयने वारंवार पुढे ढकलली होती. या उड्डाणपुलाच्या तीन मार्गिका २०२३ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु एचबी टाऊन, सेंट्रल एव्हेन्यूकडील मार्गिका आणि अंतर्गंत रिंग रोडकडील मार्गिकेचे काम अपूर्ण होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू होते. अखेर ते काम पूर्ण झाले आणि ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. परंतु आज सकाळीच या पुलाचे प्लास्टर खचल्याने खळबळ उडाली.

पूर्व नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपूरला जोडण्यासाठी व या भागात होणारी वाहनकोंडी लक्षात घेता पाच नवे उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यासाठी ७९२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. पूर्व, मध्य नागपूरला दक्षिण नागपूरशी जोडणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहनकोंडी व त्यामुळे होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तेथे उड्डाणपुल बांधण्याची मागणी या भागातील आमदारांनी केली होती.

शहरात आखणी पाच उड्डाणपूल

नागपुरात ‘महारेल’ कंपनी पाच उड्डाणपूल उभारत आहे. रेशीमबाग ते के.डी.के. कॉलेज, टेलिफोन एक्सचेंज चौक ते भांडेप्लॉट (२५१ कोटी), चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौक (६६कोटी), लकडगंज पोलीस ठाणे ते वर्धमाननगर (१३५ कोटी), नंदनवन, राजेंद्रनगर चौक ते हसनबाग चौक (६६ कोटी) आणि वर्धमाननगर ते निर्मलनगरी उमरेड रोड (२७४कोटी), या उड्डाणपुलांचा यात समावेश आहे.

Story img Loader