कळमना आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाचे वास्तव

वसतिगृहे की शैक्षणिक कोंडवाडे

ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाने वसतिगृहांची सोय केली आहे. शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्मितीसह आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. समाज कल्याण आणि आदिवासी विभागाकडे याचे संचालन असते. गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहांचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा असताना चित्र मात्र विरोधाभासी आहेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, सुरक्षेचा अभाव, अनधिकृत विद्यार्थ्यांची घुसखोरी आणि आवश्यक सुविधांचा अभाव, अस्वच्छता, पाणीटंचाई आदी प्रश्न सर्वच वसतिगृहात कमी-अधिक प्रमाणात ठळकपणे दिसून येते. वसतिगृहांना शैक्षणिक कोंडवाडय़ाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील आदिवासी आणि समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सोयी-सुविधांचा वेध घेणारी ही वृत्तमालिका

आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी आदिवासी खात्याने कोटय़वधी रुपये खर्च करून कळमना परिसरात एक दोन नव्हे तर चक्क चार भव्य इमारती उभ्या केल्या खऱ्या. मात्र अभ्यासाला पोषक वातावरण निर्मितीसाठी लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर खर्च करण्याची काटकसर केली जात आहे. इमारती बांधून आदिवासी  विद्यार्थ्यांना मदत केल्याची सरकराची कर्तव्यभावना असेलही, परंतु त्यामुळेच कदाचित पाणी, स्वच्छता, पुस्तके, मासिके, संगणक, वाय-फाय या सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

कळमना परिसरात आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या चार इमारती आहेत. यात सुमारे १२०० विद्यार्थी राहतात. कळमना एन.एल. या वसतिगृहाची क्षमताअडीचशे विद्यार्थ्यांची आहे. प्रत्यक्षात येथे तीनशेहून अधिक विद्यार्थी राहतात. येथे सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. बोअरवेल कोरडी पडली आहे. महापालिकेच्या नळाचे पाणी पुरत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना आंघोळ न करताच राहावे लागते. पिण्यासाठी पाणी मिळत नाही. ‘वॉटर प्युरिफायर’ बंद आहे.

४८ खोल्यांच्या स्वच्छतेसाठी केवळ एक सफाई कामगार आहे. यामुळे सर्वत्र धूळ आणि अस्वच्छता पसरलेली असते. वसतिगृहाच्या शेजारी सीडीई (क्षमता ५००) जे (क्षमता १२५) आणि इमामवाडा (२५) एवढी आहे. या सर्वच इमारतीत धुळीचे साम्राज्य आहे. वसतिगृहात कोण येतो आणि कोण जातो, याची कुठे नोंद नाही. हजेरी घेतली जात नाही. खोली दिली आणि दोन वेळा जेवण दिले की झाले, असा कारभार आहे. वसतिगृहातून ४० इंची एलसीडी टीव्ही चोरीला गेला. विद्यार्थ्यांच्या सायकली देखील अनेकदा चोरीला गेल्या आहेत. राज्य शासनाने सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवली आहेत.

अनधिकृत विद्यार्थी

कळमना येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहामध्ये अनधिकृत विद्यार्थी मोठय़ा संख्येने राहत असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अन्य विद्यार्थ्यांवर होत आहे. शिवाय अनधिकृत विद्यार्थ्यांना उपाहागृहातून जेवण मिळत नसल्याने विद्युत शेगडीचा वापर केला जात आहे. त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आपल्या सोईने ‘वायरिंग’ करवून घेतले. बाहेरच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश असल्याने येथे  मद्यपाटर्य़ा रंगत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

भगवाननगर, आशीर्वादनगर वसतिगृहांची अवस्थाही वाईट

समाज कल्याण खात्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या भगवाननगर आणि आशिर्वादनगर वसतिगृहात विद्यार्थ्यांची संख्या खोल्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याने एका खोलीत आठ ते नऊ विद्यार्थ्यांना कोंबण्यात आले आहे. भगवाननगर वसतिगृहातील सौऊ ऊर्जेवर चालणारा वॉटर हिटर नादुरुस्त आहे. सौर ऊर्जेच्या उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीला जेवढा खर्च येतो, तेवढय़ा किंमतीत नवीन उपकरणे घेणे परवडेल अशी अवस्था आहे. त्यामुळे विजेवर चालणारे उपकरणे बसवण्यात आल्याचे या वसतिगृहाचे गृहपाल ए.बी. हाडके म्हणाले. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, एका खोलीत अनेक विद्यार्थी राहत असल्याने अभ्यास करताना तसेच सामान ठेवण्याची मोठी अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्यासिका नाही

इमारतीमध्ये अभ्यासिका, ग्रंथालयासाठी जागा नाही. कर्मचाऱ्यासाठी असलेल्या एका गाळ्यात ग्रंथालय आहे. येथे एक-दोन टेबल आणि खुर्च्याशिवाय काहीच नाही. पुस्तकांऐवजी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एकही संगणक नाही. त्यामुळे येथे वाय-फाय सुविधेचा प्रश्नच नाही. वर्तमानपत्र दहा दिवसांपासून बंद झाल्याचे गोविंद उईके म्हणाले.

‘‘वसतिगृहाची क्षमता ७५ विद्यार्थ्यांची आहे, परंतु खोल्यांची संख्या कमी आहे. एका खोलीत आठ विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. एका खोलीत सहा विद्यार्थ्यांचे सामान ठेवण्याची व्यवस्था आहे, परंतु तेथे आठ विद्यार्थी राहतात. त्यामुळे सामान ठेवण्यास अडचण होते.’’

 – सिंब्बू कोकाटे, अध्यक्ष आरोग्य समिती, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, भगवानगर.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हे प्रमुख वसतिगृह आहे. पाणीटंचाई आणि अस्वच्छता ही येथील कामयची समस्या आहे. ग्रंथालय नाही, संगणक आणि वाय-फाय नाही.

      – आशीष गायकवाड,,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कळमना.