नागपूर : माटे चौक ते आयटी पार्क दरम्यान खाद्यपदार्थांचे हातठेले पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. हातठेल्यावर येणारे ग्राहक अस्ताव्यस्त वाहने लावत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या प्रकाराकडे सोनेगाव वाहतूक पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि बजाजनगर पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. माटे चौक ते आयटी पार्क दरम्यान रस्त्यावर, पदपाथावर खाद्यपदार्थाच्या गाड्यांची गर्दी वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीकडे ‘लोकसत्ता’ने वृत्त मालिका प्रकाशित करीत महापालिका आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांचे लक्ष वेधले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विभाग पथकाने संयुक्त कारवाई केली होती. मात्र, ती थातूरमातूर स्वरुपाची होती.
हेही वाचा >>> नागपूर : शिक्षक आमदार निवडणूकीत काँग्रेस शब्द पाळणार का?
यामुळे हातगाडी चालकांनी दोन दिवसांनंतर पुन्हा रस्त्यावर अवैधरित्या दुकाने थाटली. यावरून सोनेगाव वाहतूक पोलीस, बजाजनगर पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमण पथक यांच्या पाठिंब्यामुळेच हात गाडीचालकांची हिम्मत वाढली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई होत नसल्याने पूर्वीपेक्षा जास्त हातठेले आयटीपार्क ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर लागले आहेत. रात्री आठ वाजतानंतर हातठेल्यासमोर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते.
हेही वाचा >>> नागपूर : विद्यापीठ विधिसभा निवडणूक रिंगणात ‘शिक्षक भारती’
ग्राहक अस्ताव्यस्त वाहने ठेवतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी निर्माण होते. हातठेल्यासमोरील वाहनांमुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. तर वाहन लावण्यावरून वादही झाले आहेत. माटे चौक ते आयटी पार्क चौकापर्यंत दोन्ही बाजुला चारचाकी वाहनात हातठेल्यासारखी व्यवस्था करून खाद्यपदार्थ विक्री करण्यात येत आहे. ग्राहकांच्या वाहनांची गर्दी होत असल्याने अर्धाअधिक रस्ता वाहनाने व्यापला जातो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. विक्रेते त्यांच्याकडे उरलेले अन्न पदार्थ रस्त्यावर टाकतात. त्यामुळे मोकाट श्वानांचीही संख्या मोठ्या प्रमाणात येथे वाढल्याचे दिसते.
अतिक्रमण विरोधी पथक झोपेत?
माटे चौक ते आयटी पार्क चौकापर्यंत रस्त्यावरील हातठेल्यांनी अर्धाअधिक रस्ता व्यापला आहे. महापालिकेचे पथक आणि पोलीस यांच्यात हातमिळवणी झाल्याने कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. सुरूवातीला ४० ते ५० वाहने रस्त्यावर होती. आता मात्र दिडशेवर खाद्यपदार्थ विक्री करणारी वाहने रस्त्यावर लागली आहेत.
हेही वाचा >>> नागपूर : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, दोन युवकांचा वाकी नदीत बुडून मृत्यू
वाहतूक पोलिसांचे आर्थिक हितसंबंध?
माटे चौक परिसरातील नागरिकांनी हातठेल्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, वाहतूक पोलीस, महापालिका पथक आणि बजाजनगर पोलीस कोणतीही कारवाई करीत नाही. या यंत्रणेचे खाद्य पदार्थविक्रेत्यांशी आर्थिक हितसंबध असल्याची चर्चा आहे. खाद्यपदार्थाच्या ठेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असूनही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाहीत, हे विशेष.
हातगाडीवर मद्यपानाची मुभा
हातगाडीवर खाद्य पदार्थ विकणारे मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना सेवा देतात. येथे मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. रात्रीच्या सुमारास काही ठेल्यांवर तरूण-तरुणींना दारु, बीअरसोबत दिसतात. त्यामुळे काही हातठेले तर ‘मिनी बार’ झाल्याचे चित्र दिसते. या सर्व प्रकाराकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत.
माटे चौकापासून ते आयटी पार्कपर्यंत यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. लवकरच पुन्हा मोठी कारवाई करून त्यांची वाहने आणि हातठेले जप्त करण्यात येतील.
– अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण विभाग,महापालिका,)
मी सध्या सुटीवर आहे. त्यामुळे कारवाई करता येणार नाही. मंगळवारी मी कामावर रुजू झाल्यानंतर कारवाई करणार.
– रवींद्र पवार, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा