नागपूर : आयटी पार्क ते माटे चौक या रस्त्यावरील पदपथावर खाद्यापदार्थांची दुकाने पुन्हा सजली आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाई टाळण्यासाठी या विक्रेत्यांनी आता एक नवीन शक्कल लढवली आहे. ‘दुकानासमोर कार थांबवू नये,’ असे फलक त्यांनी दुकानांच्या दर्शनी भागावर लावले आहेत. परंतु, हे फलक केवळ दाखवण्यासाठी प्रत्यक्षात या फलकांसमोरच ग्राहकांची चारचाकी वाहने उभी राहत आहेत. विशेष म्हणजे, वाहतूक पोलीस व महापालिकेनेच विक्रेत्यांना ही पळवाट दाखवल्याची चर्चा आहे.
आयटी पार्क ते माटे चौक या रस्त्यावर खाद्यापदार्थांची शंभरावर दुकाने आहेत. या दुकानांचा पसारा पदपथाच्याही खाली आला आहे. येथे येणारे ग्राहक दुकानांसमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे अर्धा रस्ता वाहनांनी व्यापला जातो. परिणामी, रस्त्यावर रोज वाहनकोंडी होते. परिसरातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर पोलीस आणि अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली.
हेही वाचा…अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
काही दिवस खाद्यापदार्थांची दुकाने बंद होती. परंतु, नंतर सोनेगाव वाहतूक पोलीस, बजाजनगर आणि प्रतापनगर पोलीस तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुकानदारांची भेट घेतली. त्यांनी खाद्यापदार्थ दुकानदारांना नवी शक्कल सुचवल्याची माहिती आहे. ‘चारचाकी वाहने थांबवू नये,’ असे लिहिलेले फलक लावून दुकाने रस्त्यावर पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आल्याचे कळते. त्यानुसार जवळपास दीडशेवर दुकाने पुन्हा सुरू झाली आहेत. पूर्वीप्रमाणेच आता रस्त्यावर कार थांबवून ग्राहक वाहतूक कोंडी करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
हप्तेखोरीसाठी प्रोत्साहन
या परिसरात जवळपास दीडशेवर दुकानदारांकडून वाहतूक पोलीस, प्रतापनगर, बजाजनगर पोलीस आणि महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग महिन्याकाठी लाखोंचे हप्ते घेतो, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या रस्त्यावरील दुकाने बंद राहिली तर पोलीस व महापालिकेच्या पथकाचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारीच दुकानदारांच्या भेटी घेऊन रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा…टीपेश्वर अभयारण्य: व्याघ्रदर्शनासोबतच मधाची चवही चाखता येणार,अंधारवाडीत साकारले पहिले ‘मधाचे गाव’
पदपथावर खुर्च्याटेबल
स्वामी विवेकानंद चौकातून अंबाझरी टी-पॉईंट चौकापर्यंतचा रस्ता एकेरी सुरू असल्यामुळे वाहनांची वर्दळ माटे चौकातून जास्त आहे. पायी चालणाऱ्यांनी पदपथावरून चालणे अपेक्षित असते. मात्र, आयटी पार्क परिसरातील रस्त्यावरील पदपथावर चक्क खुर्च्या-टेबल टाकून ग्राहकांना खाद्या पुरवले जात आहेत. आधीच दुकानांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात पुन्हा ग्राहकांना बसण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यामुळे पायी चालावे कुठून हा प्रश्न पडला आहे.