नागपूर: शहरात नागरिकांना पायी चालण्यासाठी महापालिकेने पदपाथ बांधले आहे, पण प्रताप नगर चौकात फळविक्रेत्यांनी ते गिळंकृत केले. हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान आठ दिवसात अतिक्रमण काढले नाही तर आंदोलन करू, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश तोतवाणी यांनी केली आहे.
अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिक महिला, वृद्धांना पदपथावरून फिरता येत नाही, औषधाच्या दुकानातही जाता येत नाही. माटे चौक ते प्रताप नगर चौक या सिमेंट रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पावभाजी, पकोडे, फळ विक्रेत्यांनी पदपथावर ठाण मांडले. याबाबत महापालिकेकडे वारंवर तक्रारी करून कारवाई केली जात नाही. प्रतापनगरच्या ज्येष्ठ नागरिकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या कडेही तक्रार केली आहे, त्यानंतर तरी पदपथ मोकळे होतील, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. काही ठिकाणी दुकानदार किंवा घरमालक फेरीवाल्यांकडून पैसे घेवून त्यांना हातगाड्या लावण्यास परवानगी देतात. खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे ३० फुटाचा रस्ता १५ फुटाचा झाला आहे, याकडे तोतवाणी यांनी लक्ष वेधले आहे.