नागपूर: संपूर्ण देशात रस्ते व पुल बांधणीत विक्रम करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर नागपुरात पावसामुळे खचलेल्या एका पुलाच्या दुरूस्तीला तब्बल दीड वर्ष लागले. ३ फेब्रुवारीला तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
रामदासपेठमधील विद्यापीठ वाचनालयाजवळील हा पुल आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये या पुलाचा भाग खचला होता. त्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे रामदासपेठ मधील रहिवासी आणि त्याभागातून बर्डी किंवा दक्षिण अंबाझरी मार्गाकडे जाणा-या वाहनधारकांची गैरसोय होत होती. त्यांना फिरून बर्डी व महाराजबागजकडे जावे लागत होते. सुरूवातीला या पुलाची दुरूस्ती सहा महिन्यांत होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर हा कालावधी एक वर्षावर गेला. मात्र पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे जनाक्रोश वाढला, कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रामदासपेठ मधील नागरिकांनी कली होती.
हेही वाचा >>>अमरावतीहून विमानसेवेसाठी आणखी प्रतीक्षाच! कारण काय? वाचा…
महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात अनेकदा बैठका घेतल्या, कंत्राटदाराला समजही दिली होती. हिवाळी अधिवेशन काळात या पुलाच्या उद्घघाटनासाठी महापालिकेवर दबाव होता. मात्र पुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. आता या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तेथे केबल टाकणे सुरू आहे. येत्या दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन फेब्रुवारीला या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.