अमरावती : नागपुरातील प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे राज्‍यभरात तीव्र संताप व्यक्त होत असतानाच प्रशांत कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी अमरावतीत ‘शिवसन्मान’ मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील पंचवटी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला ट्रॅक्टर सर्वात समोर होता. मोर्चात खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, दर्यापूरचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, आदी सहभागी झाले होते.

इर्विन चौक येथे मोर्चात सहभागी झालेल्‍या नेत्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा जाहीर सभेत रुपांतरीत झाला. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला सभा मंचाचे स्‍वरूप देण्यात आले. यावेळी प्रशांत कोरटकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. काही कार्यकर्त्यांनी कोरटकरचा पुतळा खाली ओढला आणि त्याला चपलांनी तुडवला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या राष्ट्रपुरुषांचा अपमान होताना हे सरकार वेळोवेळी गप्‍प बसत असेल. मात्र महाराष्ट्र हा प्रकार सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी यशोमती ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. कोरटकरसह राहुल सोलापूरकरवर देखील गुन्हा दाखल करावा. या लोकांच्या आर्थिक चौकशी देखील व्हायला हव्यात. हे लोक महाग गाड्या घेऊन कसे फिरतात यांच्याकडे इतकी संपत्ती कशी येते, असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी केला. महाराष्ट्रात दुफळी निर्माण करण्याचे मोठे कारस्थान होत आहे. हे षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही. कोरटकर आणि सोलापूरकर हे कोणाचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. या दोघांना अटक व्हावी. कोरटकर कुठे फिरत आहे हे पोलिसांना ठाऊक आहे. हे लोक खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करत असून बहुजनांचा अपमान कोणी सहन करणार नाही असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.