भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीने उमेदवारांच्या बाबतीत कमालीचा सस्पेन्स ठेवला आहे. अखेर काँग्रेसने शनिवारी रात्री विदर्भातील ५ पैकी ४ मतदार संघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. यात नागपूर, रामटेक, गडचिरोलीसह भंडारा गोंदिया मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा गोंदिया मतदार संघातून काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः निवडणूक लढवावी अशी काँगेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आग्रही भूमिका असताना नानांनी कार्यकर्त्यांच्या भावनांच्या विरोधात जात एकतर्फी निर्णय घेतला. नानांनी स्वतः पळ काढत डॉ. प्रशांत पडोळे यांचे नाव पुढे केले. त्यामुळे आता नाना पटोले लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाही हे स्पष्ट झाले असून त्यांच्या या निर्णयाने दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसी मात्र प्रचंड नाराज झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया मतदार संघात उमेदवार कोण असणार याबाबत सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र युती आणि आघाडीने उमेदवारांच्या बाबतीत कमालीची गुप्तता बाळगली होती. दोन्ही कडून ‘पहेले आप पहेले आप ‘ चे धोरण अवलंबिले होते. युतीकडून उमेदवार जाहीर झाल्याशिवाय काँग्रेस त्यांचा उमेदवार जाहीर करणार नाही असा ठाम अंदाजही राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत होता. मात्र भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत काँगेसनेही “धक्कातंत्र”चा अवलंब केला आणि अचानक शनिवारी रात्री विदर्भातील चार मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात भंडारा गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे यांना संधी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँगेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, डॉ. निंबार्ते, माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नावांची जोरदार चर्चा असताना नानांनी डॉ. प्रशांत पडोळे यांना संधी दिली.

हेही वाचा…नागपूर : उमेदवार ठरवताना काँग्रेसचा ‘ग्रासरुट’ फार्मुला; माजी महापौर, जि.प. अध्यक्षांना 

विदर्भात सहकार महर्षी म्हणून ओळख असलेल्या दिवंगत यादवराव पडोळे यांचे सुपुत्र डॉ. प्रशांत यादोराव पडोळे यांच्यावर नानांनी एव्हढा विश्वास का टाकावा ? तर दिवंगत यादवराव पडोळे हे नानांचे गुरू त्यामुळे गुरूंचे ऋण फेडण्यासाठी तर नानांनी डॉ. पडोळे यांना उमेदवारी दिली नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण डॉ. प्रशांत पडोळे यांनी २०१४ झाली शिवसेनेच्या तिकीटावर साकोली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना केवळ २१५१ मते पडली होती. त्यांचा एवढा दारुण पराभव झाला होता की केवळ १ टक्के मते पडल्याने त्यांची अनामत रक्कम देखील जप्त करण्यात आली होती.

एवढेच नाही तर लाखनी तालुक्यातील पालांदुर जवळील त्यांचे मूळ गाव असलेल्या घोडेझरी (अंदाजे ५०० लोकसंख्येचे गाव )येथून त्यांना केवळ १२ मते मिळाली होती. स्वतःच्या गावाशी नाळ जुळलेली नसलेले डॉ. प्रशांत पडोळे आणि या आधी दारुण पराभवाला सामोरे गेलेल्या डॉ. पडोळे यांना नानांनी का निवडले हा यक्ष प्रश्न आहे? अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतागडावर नानांनी डॉ. पडोळे यांच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हापासून त्यांचे नाव अचानक चर्चेत आले आणि तेव्हापासून डॉ. पडोळे समाज माध्यमांवर आणि मीडियावर सक्रिय झाले.

हेही वाचा…गडकरींच्या विरोधात लढणारे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आहेत तरी कोण?

भंडारा गोंदियासाठी त्यांनी दावेदारी करावी असा खरतर एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही. चार महिन्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी स्वतः भाजपमध्ये जाणार असे जवळ जवळ घोषित करून टाकले होते. काँगेस पक्ष वाढविण्यात किंवा काँग्रेसी म्हणून त्यांचे कोणतेच योगदान नाही. त्यांच्याकडे एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे त्यांना या उमेदवारीसाठी संधी देण्यात आली ती म्हणजे आर्थिक तुल्यबळ. भाजपच्या उमेदवारापुढे टिकण्यासाठी किंवा त्याला पुरून उरेल अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवाराची गरज काँग्रेसला होती. त्यामुळे आर्थिक तुल्यबळ ही एकमेव काय ती डॉ. पडोळे यांची जमेची बाजू. मात्र हा मुद्दाही फोल ठरू शकतो कारण असे असते तर प्रफुल पटेलांना या मतदार संघात कधीच पराभवाला सामोरे जावे लागले नसते, ते ही नाना पटोले किंवा माजी खा. शिशुपाल पटले यांच्या सारख्या नेत्याकडून. त्यामुळे वडिलांनी कमावून ठेवलेली संपत्ती डॉ. पडोळे यांना या निवडणुकीत तारू शकणार नाही अशीही चर्चा आहे.

डॉ. पडोळे यांचे वडील दिवंगत यादवराव पडोळे यांनी केलेल्या दुग्धक्रांतीमुळे ते विदर्भात सहकार महर्षी म्हणून विख्यात आहेत. नाना पटोले, सुनील फुंडे यांच्यासारखे नेते त्यांनी घडविले. स्व. यादोराव पडोळे हे भंडारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. कधीकाळी त्यांनी देखील साकोली विधानसभा निवडणुक घड्याळ चिन्हावर लढविली होती. मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले स्व. यादोराव पडोळे यांनाही पब्लिक सेक्टरमध्ये स्वतःला सिद्ध करता आले नव्हते. त्यामुळे त्यांचे सुपुत्र डॉ. पडोळे यांना नानांनी हिरवी झेंडी देणे म्हणजे मागील वेळी प्रमाणे (२०१९ मध्ये नाना पंचबुधे हे नानांचे डमी उमेदवार होते) डमी उमेदवार देणे तर नाही ना असेही बोलले जात आहे. शिवाय साकोली येथे झालेल्या बैठकीत आणि तुली रिसॉर्ट येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नानांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह धरला होता. नाना लढणार नसतील तर काँग्रेसच्या कोणत्याही निष्ठावंतालाच संधी द्यावी असाही एकसुर यावेळी निघाला. जर काँग्रेसच्या निष्ठावंत उमेदवाराकडे आर्थिक प्राबल्य नसेल तर आम्ही सगळे आर्थिकदृष्ट्या मदत करून आपल्या उमेदवाराला विजयी करू अशी गळही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातली होती.

हेही वाचा…चंद्रपूर: भाजप व काँग्रेसचीच चर्चा, छोटे पक्ष झाकोळले

भंडारा गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील एकही तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी किंवा कार्यकर्ता कुणीही डॉ. पडोळे यांच्या नावाला पसंती दिली नाही अशीही माहिती आहे. असे असताना नानांनी कार्यकर्त्यांच्या भावनांच्या विरोधात जात त्यांना दुखावून एकतर्फी निर्णय घेतला. काँग्रेसच्या निष्ठावंतांना डावलून नानांनी हा निर्णय घेतला त्यामुळे साहजिकच दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नानांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशीही मागणी केली जात आहे मात्र नाना त्यांचा फोन बंद करून बसले आहेत. डॉ. पडोळे उमेदवार असतील तर भाजप उमेदवाराचा विजय निश्चित असल्याच्या चर्चांनाही आता उधाण आले आहे. शिवाय खुद्द डॉ. पडोळे यांचे समर्थकही “ते” हरणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात करीत आहेत मात्र या निमित्ताने का होईना आपले हात ओले करता येतील एवढ्यासाठी तेही खुश आहेत. असे असले तरी अद्याप युतीच्या उमेदवाराचे नाव पुढे आलेले नसून लवकरच चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा…नागपूर : पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नानांनी दोन उमेदवारी अर्ज का घेऊन ठेवलेत ?…

नाना पटोले यांनी डॉ. पडोळे यांना उमेदवार जाहीर केला असला तरी नानांनी दोन अधिकचे उमेदवारी अर्ज घेऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नानांची ही खेळी अद्याप कुणालाही समजलेली नाही. मात्र २०१९ च्या निवडणुकीत चंद्रपुर मतदार संघात काँग्रेसने बांगरे यांना उमेदवारी दिली होती आणि ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या धानोरकर यांना तिकीट देत पुढे केले होते. त्यामुळे यावेळी देखील नानांचे ” खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तर” नाही ना अशी ही चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.