संरक्षण देण्यास पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने देशात दलितांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ असून दलितांना स्वरंक्षणासाठी शस्त्र दिली जावीत, असे खासदार रामदास आठवले यांनी म्हटले आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्य़ात एका दलिताच्या घराला लावण्यात आलेल्या आगीचा संदर्भात बोलताना आठवले यांनी संवेदनशील जिल्ह्य़ात अतिरिक्त विशेष दल तैनात करण्यात यायला हवे. सवर्ण आणि दलितांना एकत्र आणण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात यावे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात यावे. दलितांना स्वरंक्षणासाठी शस्त्रे देण्यात यावी. दलितांकडे शस्त्र असल्याचे कळल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणी करणार नाही. महाराष्ट्रात अॅट्रॉसिटी लावल्यानंतर लगेच जामीन दिला जातो. त्यामुळे देखील दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रात मोदी सरकार आल्याने दलितांवर हल्ले वाढले आहेत काय, असे विचारले असता, काँग्रेसचे सरकार असतानाही दलितांवर अत्याचार होत होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार आहे तेथेही दलितांवर अत्याचा होत आहेत. यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करणार आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री व्ही.के.सिंग यांच्या दलितांविषयक वक्तव्याचा निषेध करतो. लष्कराचे माजी प्रमुखपद भूषविलेल्या व्यक्तीला असे बोलणे शोभत नाही, असेही ते म्हणाले.