यवतमाळ : जिल्ह्यातील तरुणाई दिवसेंदिवस व्यसनांच्या गर्तेत आहे. जिल्ह्यात गांजा सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई गांजाच्या नशेत विविध गुन्हे करत आहे. अलीकडेच महागाव व राळेगाव तालुक्यात गांजा शेतीचाही पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता गांजा विक्री करणाऱ्यांसह तो सेवन करणाऱ्यांवरही कारवाईचा फास आवळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा नशामुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी हे अभियान हाती घेतले आहे. गेल्या २२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या ११ महिन्यांत ‘एनडीपीएस’ कायद्यअंतर्गत तब्बत ६९ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा – नागपुरात विमान प्रवाशांची संख्या ४१ टक्क्यांनी वाढली; राजकीय दौरे, पर्यटकांचा ओढा वाढल्याचा परिणाम

शहरात कुठेही गांजा विकत मिळणार नाही, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी लहान मोठ्या गांजाविक्रेत्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे निर्देश पोलीस पथकाला दिले आहे. जिल्ह्यात आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण, हरियानातून गांजाची तस्करी केली जाते. गांजाचे व्यसन असणाऱ्या तरुणांचे पाय गुन्हेगारीत रुतत चालले आहेत. शहरातील गल्लीबोळात वास्तव्यास असणारी गरीबच नव्हे, तर मध्यमवर्गीय घरातील मुले गांजा व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून नेमका याच मुलांना गुन्हा करण्यासाठी हेरले जात आहे.

कुठे-कुठे गांजाचा धूर सोडला जातो, त्याची कुंडलीच तयार करण्यात आली आहे. ज्या-ज्या ठिकाणी गांजाचा धूर सोडणारे टोळके आहेत. अशा ठिकाणांवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवल्या जात आहे. जंगलालगत असलेल्या भागात काही जण अतिरिक्त पैसे कमविण्याच्या नादात गांजा शेतीकडे वळले आहेत. महागाव व राळेगाव तालुक्यात गांजा शेतीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या अकरा महिन्यांत ६९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यातील आरोपींची संख्या ९० असून, मुद्देमालाची किंमत ५२ लाख २६ हजार ३६८ रुपये इतकी आहे.

गांजा विक्रेते हे चोरट्या पद्धतीने पुडीतून विक्री करतात. कमर्शिअल क्वाँटिटी असल्याशिवाय पोलिसांना कारवाई करता येत नाही. ही तांत्रिक पळवाट गांजा विक्रेत्यांनी शोधली आहे. नेमका त्याच पद्धतीचा अवलंब त्यांच्याकडून केला जात आहे. महानगरात केला जाणारा एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) महागडा शौक यवतमाळ जिल्ह्यात केला जात आहे. एक ग्रॅम एमडी ड्रग्ससाठी सहा ते सात हजार रुपये मोजावे लागते. तीन वेळा एमडी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. प्रतिष्ठित घरातील मुले या नशेच्या आहारी गेली आहेत. तीन कारवाईत १३ लाख ७२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – भंडारा : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पहिल्या प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराबरोबर मिळून काढला काटा; त्रिशंकू प्रेमातून नयनची हत्या

तरुणाईला या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नशामुक्त पहाट अभियान राबविण्यात येत आहे. महागाव व राळेगाव तालुक्यात गांजा शेतीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गांजाची नशा करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. एमडी ड्रग्सची तस्करी करणार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात गांजाविक्री होणार नाही, यासाठी विशेष मोहीमच हाती घेण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी स्पष्ट केले.

२०२३ मध्ये सर्वाधिक कारवाया

२०२२ मध्ये आठ गांजाप्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले होते. २००३ मध्ये- चार, २००४- चार, २००५- पाच, २००६- आठ, २००७- चार, २००८- तीन, २००९- तीन, २०१०- एक, २०११- एक, २०१२- सहा, २०१३- चार, २०१४- सहा, २०१५- एक, २०१६- एक, २०१७- सहा, २०१८- पाच, २०१९- ११, २०२०- सहा, २०२१- सहा, २०२२- चार आणि २०२३ या वर्षांत गांजाचे-सात, एमडी ड्रग्ज-तीन, सेवन प्रकरणी ५९ कारवाया करण्यात आल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the first time in 22 years 69 actions were taken in connection with the sale and consumption of ganja in yavatmal district nrp 78 ssb
Show comments