भंडारा: मंडप सजला, बँडबाज्यासह वऱ्हाडी आले आणि लग्न घटिका समीप येताच सर्वत्र उत्साह संचारला. हा लग्न सोहळा खास असल्याने या सोहळ्याला खास पाहुण्याला आमंत्रित करण्यात आले. हा पाहुणा आहे वरुण राजा. होय पावसाला आमंत्रण देण्यासाठी बाहुला बाहुलीचं लग्न लावण्यात आले. लाखांदूर शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा पार पाडला. वरूण राजाला पावसासाठी साकडे घालून पावसाची प्रतीक्षा संपवावी म्हणून बाहुला बाहुलीचा स्वयंवर आयोजित करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न मंडप हिरव्यागार झाडांच्या फांद्यांनी सजला. सायंकाळ झाली अन् नवरदेव रुपी बाहुला लग्न मंडपात येण्यासाठी जानवशावरून निघाला. नवरदेव रुपी बाहुल्यासोबत एक दोन नव्हे चक्क १०० हून अधिक वऱ्हाडी वरातीत सामील झाले. वरातीत वऱ्हाडी बेधुंद नाचू लागले. वाजत गाजत वरात लग्न मंडपात पोहचली. तर बाहुली नटून थटून नवरीच्या रुपात मंडपात आसनस्थ झाली. चक्क पाच मंगलाष्टके झाले आणि बाहुला-बाहुलीचा लग्न सोहळा पार पडला. नंतर वऱ्हाड्यांसाठी स्वादिष्ट जीवांची सोय केली होती. त्यावर पाहुण्यांनी ताव मारला.

हेही वाचा… नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

भंडाऱ्यात पावसाने हजेरी जरी लावली असली तरी लाखांदूर तालुका अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता लाखांदूर वासीयांनी बाहुला बाहुलीचे लग्न लावून वरूण राजाला खुश करण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार पाऊस पडून बळीराजा सुखावला पाहिजे, अशी विनवणी केली. आता पाऊस बरसणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. असे जरी असले तरी तूर्तास गोष्ट बाहुला बाहुली च्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the rain the wedding of a doll in lakhandur bhandara ksn 82 dvr