वर्धा : बाजार समितीच्या निवडणुका गावगड्यात फार जिकरीने लढल्या जातात. अलोट पैसा ओतल्या जातो. वाट्टेल तशी तडजोड होते. हिंगणघाट बाजार समितीच्या निवडणुकीतही असेच दिसून येत आहे. येथील भाजपाचे आमदार समीर कुणावार यांनी पक्षनिष्ठा खुंटीवर टांगून काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी यांच्याशी साटेलोटे केले. पदरात तीन जागा मिळवून उमेदवार उभे केले. हे पाहून संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी स्वतःचे पॅनल उभे करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे यांनी भाजपाचे उमेदवार उभे करीत खासदार रामदास तडस यांना साकडे घातले. खासदार पक्षाची प्रतिष्ठा म्हणून हिंगणघाट येथे तळ ठोकून बसले. जिल्हाध्यक्ष सुनील गफट म्हणाले की सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार नाहीत. स्थानिक युती करीत आम्ही लढत आहोत. कुणावार आमच्या सोबत नाहीत.
हेही वाचा – वृद्ध मतदारांचे होणार सर्वेक्षण; काय आहेत निवडणूक आयोगाचे निर्देश?
नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, या बाजार समितीअंतर्गत देवळी मतदारसंघाचा अलीपुर व अन्य भाग येतो. याच ठिकाणी भाजपाने उमेदवार दिले आहेत. काँग्रेसचे कांबळे यांना इंगा दाखवायचा हा प्रयत्न असल्याचे म्हटल्या जाते.