वर्धा : परंपरेत सर्वात प्रथम व सर्वात मोठा मान तो जावयाचा. आता राजकारणातही तेच दिसून आले. वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आघाडीच्या जागावाटपात गेला. समर्थ उमेदवार मिळत नसल्याचे पाहून काँग्रेसतर्फे लढण्यास इच्छुक माजी आमदार अमर काळे यांना लढण्याचे साकडे घातले. अमर काळे हे पत्नी मयुरासह पवारांना भेटले. यथोचित विचारपूस झाल्यावर त्यांना पक्षातर्फे लढण्याची तयारी करण्यास सांगितले. त्यांनीही औपचारिक भेटी पूर्ण करीत शेवटी राष्ट्रवादीचा शेला गळ्यात घातला. कारण, शेवटी ते जावई.
तब्बल अठरा वर्ष केंद्रात कृषिमंत्री राहिलेले अण्णासाहेब शिंदे यांचे थोरले चिरंजीव अशोक शिंदे यांच्या कन्या मयुराताई या अमर काळे यांच्या अर्धांगिनी. त्या सांगतात की, आजोबांच्या काळापासून आमचे पवार कुटुंबाशी कौटुंबिक नाते राहिले. शिंदे प्रतिष्ठानचे अध्यक्षपद शरद पवार सांभाळतात. त्यांनी वर्षभरापूर्वी आर्वीत बचत गटाची कामे करण्यास प्रतिष्ठानचा निधी मयुरा काळे यांना उपलब्ध करून दिला होता. आता शरद पवारांनी जावयास उमेदवारी देत परंपरा पाळली, असे गंमतीने म्हटल्या जात आहे.
हेही वाचा…नागपुरात काँग्रेसचा दुसरा गट पक्षाचे काम करणार का?
दुसरीकडे, शरद पवार जावयाचा मान राखत असताना सगेसोयरे मात्र कमालीचे नाराज झाले होते. म्हणजे अमर काळे यांना उमेदवारी दिली म्हणून स्वपक्षीय नेते रुष्ट होऊन बसले होते. म्हणून अमर काळे यांना मानाचा शेला टाकण्यापूर्वी शरद पवार यांनी या सर्व नाराज मंडळींची समजूत काढली. तुम्ही घरचेच आहात. तुमचा योग्य तो मान आम्ही आणि जावईबापू पण राखतील. त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना निवडून आणणे ही तुमची जबाबदारी, अशी समजूत काढण्यात आल्याचे बैठकीत उपस्थित एकाने नमूद केले. त्यामुळे ‘सगेसोयरे’ मंडळींची जबाबदारी आता वाढल्याचे बोलल्या जाते. किंबहुना त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी टाकून शरद पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.