नागपूर : राज्यात पावसाचा जोर वाढत असून उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात  पावसाने ठाण मांडले आहे. सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आठवड्याच्या अखेरीस शनिवार आणि रविवारी रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाचा मुक्काम राहील, असा अंदाज दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता  आहे. पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वायव्य झारखंड आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्याकडे येण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मान्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, खजुराहो, व कमी दाबाचे केंद्र, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सुरुवातीच्या दोन आठवड्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे हल्ले थांबेनात, पुन्हा एक शेतकरी…

मुसळधार पाऊस कुठे?

कोकणातील रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुढील दोन दिवसांचा अंदाज

रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forecast of the meteorological department there is a possibility of heavy rain in some parts of maharashtra nagpur rgc 76 amy