नागपूर : नागपूर हे देशाचे टायगर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. तीनशे किलोमीटरच्या अंतरावर पाच व्याघ्रप्रकल्प आहेत. दरवर्षी लाखो देश-विदेश पर्यटक येथे व्याघ्र दर्शनाला येतात. मागील दहा वर्षात नागपूर शहर राज्याची राजकीय राजधानी म्हणूनही नावारूपाला आले आहे . केंद्रीय मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गृहशहर असल्याने विविध कार्यक्रम, बैठकांच्या निमित्ताने नागपुरात केंद्र,राज्याचे, देश- विदेश अर्थविषयक संस्थांचे बडे अधिकारी येत असतात. फावल्या वेळात तेही जंगल भ्रमण करून येतात. प्रत्येकाला व्याघ्रदर्शन होतेच, असे नाही.पण ज्याला होते तो भाग्यशाली ठरतो. त्यांच्यासाठी तो अविस्मरणीय ठरतो. तो अधिकारी जर विदेशी असेल तर मग सांगायलाच नको! कोणाला सांगू अन् कोणाला नाही असे त्याला होते. मग समोर राज्याचे मुख्यमंत्री का असेना.!  असाच एक प्रसंग शुक्रवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत घडला.

स्थळ होते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘ रामगिरी ‘ . वेळ स़ंध्याकाळची. बैठक होती नदीजोड प्रकल्पाला अर्थसहाय्य करणा-या विदेशी बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीनिमित्त नागपुरात आलेल्या विदेशी बँकेंच्या अधिका-याने सकाळी नागपूर नजिकच्या व्याघ्रप्रकल्पला भेट दिली. तेव्हा  त्यांना अगदी जवळून व्याघ्र दर्शन झाले. व्याघ्र दर्शनाने हे अधिकारी इतके आनंदी झाले की त्यांनी हा किस्साच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांच्यासोबतच्या बैठकीत सांगितला. या अधिका-याचे नाव आहे.हुन किम आणि ते आहेत एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष.

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या प्रकल्पाची माहिती दिली अन् त्यासाठी अर्थसहाय्य करण्याची विनंती बैठकीत सहभागी हुन किम यांच्यासह इतर विदेशी बँकेच्या प्रतिनिधींना केली. यावेळी बॅंक अधिका-यांनीही त्याची भूमिका मांडली.  एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करु, असे सांगितले  व त्यांनी मुख्यमंत्र्यांना व्याघ्र दर्शनाचा किस्साही सांगितला. ते म्हणाले “गेले २५ वर्षांपासून मी भारतात येतोय, पण आतापर्यंत कधी वाघ दिसला नाही. आज ( शुक्रवारी)उमरेडला सकाळी गेलो होतो, आणि अतिशय जवळून वाघ दिसला”  हा किस्सा ऐकून मुख्यमंत्रीही सुखावले.

बैठकीला कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू, ‘मित्रा’चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवार, तापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकर, कोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

Story img Loader