नागपूर : श्रीमंतीचे प्रदर्शन करावे तर किती? एरवी महापालिकेला अतिक्रमण दिसत नाही, पण शहरात जी-२० च्या आयोजनाने महापालिकेला या अतिक्रमणाची आठवण झाली आणि रस्त्यावर चहा, उसाचा रस विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांचे सामान चक्क उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला. जप्त केलेले सगळे साहित्य चक्क मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे.
जी २० परिषदेच्या नावावर शहरात स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाची मोहीम राबवताना, दाखल होणाऱ्या विदेशी पाहुण्यांसमोर गरिबीचे प्रदर्शन नको म्हणून, नागपुरातील फुटपाथ दुकानदारांना प्रशासनाने लक्ष्य केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली त्यांचा माल माल तर जप्त केला, पण कारवाईच्या नावाखाली त्यांच्या उपजिविकेची त्याची इतर साधने उद्धवस्त करण्याचा प्रकार मात्र लाजिरवाणा ठरला आहे. असाच एक प्रकार शहराच्या सेमिनरी हिल्स परिसरात समोर आला आहे. महापालिकेच्या धरमपेठ झोन कर्मचाऱ्यांनी गरीब फुटपाथ दुकानदारांचे ठेले आणि दुकानातील साहित्य व माल जप्त करून सरळ मातीच्या ढिगाऱ्यात दाबून टाकला आहे.
हेही वाचा >>> अनंतराव देशमुखांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससमोरील आव्हानात भर
शहराच्या सेमिनरी हिल्स परिसरातील गौरखेडे कॉम्प्लेक्स समोरील मैदानात अनेक दुकानदारांचा विक्रीसाठीचा माल आणि इतर वस्तू डंप करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मनपाच्या धरमपेठ झोनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यांना दुकान न लावण्यासाठी धरमपेठ झोनच्या कर्मचाऱ्यांनी मनाई केली होती. त्यामुळे दुकान न लावता दुकानदारानी आपला माल रस्त्याच्या कडेला लागलेल्या भिंतीच्या मागे लपवून ठेवला होता. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उसाचा हा ढीग, फुटाळा परिसरातून उचलून सेमिनरी हिल्सच्या गौरखेडे कॉप्लेक्स जवळील मैदानात नेऊन टाकला.
फक्त रसवंतीच्या ठेल्यावरच नाही तर चहाच्या टपऱ्या, चायनीजच्या ठेल्यावरही कारवाई करून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी ठेले , गॅस शेगडी, स्वयंपाकाचे साहित्य आणि दुकानाच्या साहित्य आदी माल जेसीबीच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्यात टाकले. जी २० च्या नावावर कारवाई करण्याच्या नावाखाली झालेला हा प्रकार अत्यंत लाजिरवाणा, धक्कादायक आणि दुर्दवी असून, कारवाईच्या नावाखाली गरिबांचे कुटुंब उधवस्त करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी फुटपाथ दुकानदारांनी केली आहे.