वन्यप्रेमींची मात्र कारवाईवर टीका; फॉरेन्सिक, बॅलिस्टिक चाचणीची पशुवैद्यकांची मागणी

गेल्या दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवडय़ातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचे वनखात्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र, या वाघिणीच्या मृत्यूवरुन संशयाचे वातावरण निर्माण झाले असून पशुवैद्यकांकडून फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक चाचणीची मागणी केली जात आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची पायमल्ली करीत ही कारवाई केल्याची टीका वनखात्यावर होत आहे. मात्र, वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. वनखात्याच्या पथकाने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघिणीने हल्ला केल्यामुळे नाईलाजास्तव तिला गोळ्या घालाव्या लागल्या, असे वनखात्याने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

वर्षभरापूर्वी तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण ती गर्भवती असल्यामुळे कारवाई थांबवण्यात आली. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात या वाघिणीच्या हल्ल्यात गावकऱ्याचा बळी गेल्यानंतर ‘दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे’ आदेश देण्यात आले. स्वयंसेवी संस्थांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आधी तिला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करा, हेच सांगितले होते.

न्यायालयाच्या निकालानंतर २२ सप्टेंबरला पुन्हा एकदा वनखात्याने तब्बल २०० जणांसह तिला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी खात्यातील पशुवैद्यकांसह हैदराबादचा नेमबाज नवाब शआफ़तअली खान याला पाचारण करण्यात आले. तब्बल दीड महिना चाललेल्या या मोहिमेत वनखात्याने सुरुवातीला हत्ती, त्यानंतर इटालियन कुत्रे, पॅरामोटर, केल्विन क्ले असे सर्व पर्याय वापरले. मात्र, या पर्यायाला वाघिणीने दाद दिली नाही.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या ‘युरीन थेरपी’चे सकारात्मक परिणाम दिसून येत असताना, शुक्रवारी ही वाघीण बोराटी गावाजवळ गावकऱ्यानां दिसली. ती टी-वन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच वनखात्याचे पथक त्याठिकाणी पोहोचले आणि तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. ती उलट चाल करून येत असल्याचे दिसून आल्यामुळे नेमबाज नवाबचा मुलगा असगर याने तिला गोळी घालून ठार केले. गोरेवाडा बचाव केंद्रात या वाघिणीचे शवविच्छेदन करून तिचे दफन करण्यात आले. वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या दोन बछडय़ांना बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी वनखात्याचा चमू पांढरकवडा येथेच तळ ठोकून आहे.

सर्व नियम धाब्यावर?

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही वन्यप्राण्याला बेशुद्ध करता येत नाही किंवा गोळी घालता येत नाही. परिस्थिती खूपच वाईट असेल तर अपवादात्मक प्रकरणात प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन तसे करता येते. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे औषध हाताळण्याचा अधिकार भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच आहे. मात्र, या वाघिणीला एका वनरक्षकाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे याठिकाणी नियमाची पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे.